दिल्लीतील ‘म-हाटी एम्पोरियम’मध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे भव्य प्रदर्शन व विक्री सुरू
नवी दिल्ली, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील गणेशभक्तांसाठी पर्यावरणपूरक आणि आकर्षक गणेशमूर्तींची पर्वणी उपलब्ध झाली आहे. बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या म-हाटी एम्पोरियम’मध्ये गणेशमूर
नवी दिल्ली


नवी दिल्ली, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील गणेशभक्तांसाठी पर्यावरणपूरक आणि आकर्षक गणेशमूर्तींची पर्वणी उपलब्ध झाली आहे. बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या म-हाटी एम्पोरियम’मध्ये गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील पारंपरिक मूर्तीकलेला प्रोत्साहन देतानाच दिल्लीतील गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हे प्रदर्शन १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून दिल्लीमध्ये गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून, हा उपक्रम महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचा राजधानीत सातत्याने परिचय करून देत आहे.

भारत सरकारच्या सह महालेखानियंत्रक सुप्रिया देवस्थळी यांच्या हस्ते आज या प्रदर्शन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, गणेशमूर्ती कलाकार सपना जाधव, वीणा भाट तसेच त्यांची टीम उपस्थित होती.

यंदाच्या प्रदर्शनात पेण येथील प्रसिद्ध मूर्तीकार सपना जाधव आणि वीणा भाट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कारागिरांनी साकारलेल्या ५०० हून अधिक आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या या मूर्ती ६ इंचांपासून ३ फुटांपर्यंतच्या विविध आकारांत उपलब्ध असून, त्यांची किंमत १,५०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

गणेशमूर्तींसोबतच येथे पूजेसाठी लागणारे विविध साहित्य, आकर्षक सजावटीच्या वस्तू, पारंपरिक पैठणीची तोरणे, आसने आणि विविध पूजावस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रदर्शनाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे गणेशभक्तांना येथे महाराष्ट्रीयन पद्धतीची गरमागरम पुरणपोळीचाही आस्वाद घेता येणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना महाराष्ट्राच्या पारंपरिक कला, हस्तकला आणि खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून दिल्लीकरांना मिळणार आहे.

गणेशमूर्तींच्या बुकिंगसाठी व अधिक माहितीसाठी ०११-२३३६३८८८ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच गणेशमूर्तींसंदर्भात सपना जाधव ९९७०२७७५५७ आणि वीणा भाट ८९९९१२०९४९ यांच्याशी संपर्क साधावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande