
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली आहे. विद्यापीठ परिसरातील मेसमध्ये अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारींसह परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले.विद्यापीठातील मेसमध्ये विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार हा दर्जाहीन असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. अन्नाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. मेस परिसरातील अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनल्याचे अभाविपने म्हटले आहे.दरम्यान, विद्यापीठ परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. शैक्षणिक परिसरात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे अत्यंत गंभीर असून, यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.या सर्व प्रकाराविरोधात अभाविपच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सकस आणि दर्जेदार आहार मिळावा तसेच मेस व्यवस्थेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि सुरक्षेशी कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी