उदगीर तालुक्यात सहकार विभागाची कारवाई; अवैध सावकारांविरोधात ५ ठिकाणी धाडी
लातूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर आणि तालुक्यामध्ये कथित अवैध सावकारी व्यवहारांना चाप लावण्यासाठी सहकार विभागाने जोरदार पाऊल उचलले आहे. प्रकाश रमेश अंबेसंगे (रा. आनंदनगर नांदेड रोड, उदगीर), कोडींबा तुकाराम मुंडे (रा. जायभायची
अवैध सावकारी


लातूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर आणि तालुक्यामध्ये कथित अवैध सावकारी व्यवहारांना चाप लावण्यासाठी सहकार विभागाने जोरदार पाऊल उचलले आहे. प्रकाश रमेश अंबेसंगे (रा. आनंदनगर नांदेड रोड, उदगीर), कोडींबा तुकाराम मुंडे (रा. जायभायचीवाडी, ता. उदगीर) आणि विलास शिवाजी बोळेगावे (रा. हंडरगुळी, ता. उदगीर) यांनी सहकार विभागाकडे दाखल केलेल्या तीन वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारींच्या अनुषंगाने केलेल्या प्राथमिक चौकशीत प्राप्त माहितीच्या आधारे, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये सहकार विभागाच्या ५ विशेष पथकांनी संशयित ५ व्यक्तींच्या निवासस्थानी आणि व्यवसायाच्या ठिकाणांवर एकाच वेळी झडती व धाडसत्र राबवले.

या कारवाईत कथितरीत्या सावकारी व्यवसायाशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, रोकडवह्या, खतावणी, कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर्स, तसेच स्थावर मालमत्तेचे खरेदीखत व ईसारचिठ्या यांसारखी महत्त्वपूर्ण कागदपत्रे पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आली असून, त्या आधारे पुढील कायदेशीर चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

ही कार्यवाही सहकार अधिकारी डी.बी. कांबळे, सहकार अधिकारी पराग देशमुख, मुख्य लिपीक एस.जे. जाधव, सहकार अधिकारी आर.एस. गायकवाड आणि मुख्य लिपीक जे.एस. चोले यांच्या नियंत्रणाखालील ५ पथकांमधील एकूण २१ सहकार कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या पथकांना मदत म्हणून महसूल, कृषी, दुग्धविकास आणि ग्रामविकास विभागाचे १० कर्मचाऱ्यांनी शासकीय पंच म्हणून भूमिका बजावली, तर सुरक्षेच्या दृष्टीने उदगीर शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यातील १० पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सदर धाडसत्र लातूरचे जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) नानासाहेब चव्हाण, जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक व्ही.एल. पोतंगले आणि उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवण्यात आली. या कारवाईनंतर सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, उदगीर) महेश कच्छवे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे की, जर त्यांच्या परिसरात किंवा तालुक्यात बेकायदेशीर व अवैध सावकारीचे व्यवहार सुरू असतील, तर त्यांनी न घाबरता संबंधित तालुका सहाय्यक निबंधक किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालय, लातूर यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करावी.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande