परभणीत सोमवारपासून ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’चे आयोजन
स्थानिक उद्योजक, उत्पादकांना विक्रीसाठी भव्य व्यासपीठ परभणी, 04 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उत्पादक व स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध कर
परभणीत सोमवारपासून ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’चे आयोजन


स्थानिक उद्योजक, उत्पादकांना विक्रीसाठी भव्य व्यासपीठ

परभणी, 04 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)च्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उत्पादक व स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दि. ७ व ८ सप्टेंबर रोजी ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’चे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम कौस्तुभ मंगल कार्यालय, परभणी येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत प्रदर्शन व विक्री करण्यासाठी सर्वांना खुला राहणार आहे.

‘अमृतपेठ थेट बाजारपेठ’च्या माध्यमातून स्थानिक उत्पादक व विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रदर्शनात विविध प्रकारच्या वस्तू, स्वादिष्ट खाद्यपदार्थ, कपडे, घरगुती उपयोगाच्या वस्तू, कलात्मक वस्तू, ज्वेलरी आदी उत्पादनांचे स्टॉल राहणार आहेत. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देणे, स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि नागरिकांना दर्जेदार व विश्वासार्ह उत्पादने उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बीएसएनएल कार्यालयाच्या बाजूला, परभणी येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande