लातूर - माझे मंडळ, माझी जबाबदारीचा संदेश देत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन
लातूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, जनजागृती आणि समाजप्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवली. याच विधायक उद्देशाने अहमदपूर शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. उत्सवाच्या काळात
अरविंद रायबोले


लातूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, जनजागृती आणि समाजप्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवली. याच विधायक उद्देशाने अहमदपूर शहरातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच ‘माझे मंडळ, माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबवून डीजेमुक्त मिरवणूक, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी केले.

लातूर जिल्हा पोलीस दल व प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या सभागृहात आयोजित गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून अरविंद रायबोले बोलत होते.

अरविंद रायबोले म्हणाले की, “गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक प्रबोधन करणारा उत्सव व्हावा. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणले. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत अहमदपूरातील गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपावी. प्रत्येक मंडळाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन व पोलीस दलाला सहकार्य करावे. डीजेचा अतिरेक टाळून शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध मिरवणुका काढाव्यात.”

राष्ट्रीय एकात्मतेचा आदर्श संदेश

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरात मुस्लिम संघटनांच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या समन्वयातून शांतता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य देत ही रॅली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबद्दल सोहेल कुरेशी व खलील कुरेशी यांचा उल्लेख करण्यात आला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार उज्वलाताई पांगरकर होत्या. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, गटविकास अधिकारी पंकज शेळके, महावितरणचे मुख्य अभियंता दिनेश पाटील, नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अशोक स्वामी, उपनगराध्यक्ष अय्याज शेख, नगरसेवक ॲड. किशोर कोरे, नगरसेवक ॲड. निखिल कासनाळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गणेश मंडळांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रमाकांत अरुणुरे, संतोष मजगे, मुकेश पाटील, उत्तम वाघमारे, मुजफ्फर देशमुख, गणेश कोदळे, मनोहर पाटील, ॲड. किशोर कोरे, ॲड. निखिल कासनाळे, बालासाहेब आगलावे तसेच मुख्य अभियंता दिनेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करून विविध सूचना मांडल्या.

सेवानिवृत्तीबद्दल पत्रकार राम तत्तापूरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास कार्यकारी नगरसेवक डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, एपीआय संतोष केदासे, धर्मराज चावरे, संतोष निटुरे, गौरव भुसारे, साईनाथ पाटील, एपीआय श्रीनिवास राठोड, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष संग्राम बरूरे, पोलीस पाटील उषाताई पवार, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, गणेश भक्त आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपनगराध्यक्ष अय्याज शेख यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहमदपूर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande