डोंबिवली - गणेश नगरमधील त्रिमूर्ती हॉल परिसरातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात
डोंबिवली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिमेतील गणेशनगर येथील त्रिमूर्ती हॉल परिसरातील नवीन रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निधीतून प्रभाग
Ph01


डोंबिवली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिमेतील गणेशनगर येथील त्रिमूर्ती हॉल परिसरातील नवीन रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक २१ मधील विविध विकासकामांना गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात वेग आला असल्याची माहिती भाजपा नगरसेविका डॉ. रविना म्हात्रे यांनी दिली.

भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर (नंदू) परब यांच्या हस्ते नारळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना परब यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून प्रभागातील विविध विकासकामांना वेग येत असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ. रविना म्हात्रे म्हणाल्या की, प्रभागातील अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लागत आहेत. सुभाष रोडच्या प्रलंबित कामासह भागशाळा मैदानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. भागशाळा परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच नवीन फुटपाथचे काम सुरू आहे. म्हात्रेवाडी आणि श्रीधर म्हात्रेवाडी परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असून कर्वे रोड येथील पेट्रोल पंपासमोरील रस्ता तसेच गणेशनगर आणि प्रभागातील इतर भागांमध्येही विकासकामे वेगाने सुरू आहेत.

विष्णूनगर येथील बादाम गल्ली, जाधववाडी आणि शिवमंदिर परिसरातील नवीन रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. तसेच श्रीधर म्हात्रेवाडी येथील केर्लियन चर्च परिसरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणही नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.

या परिसरातील नागरिकांकडून नवीन जलवाहिनीची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आमदार रवींद्र चव्हाण यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे. गणेश चतुर्थीनंतर नवीन जलवाहिनीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. म्हात्रे यांनी सांगितले.

तर राहुल म्हात्रे म्हणाले की, नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर प्रभागातील विविध महत्त्वाच्या विकासकामांसाठी आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी गणेश नगरमधील त्रिमूर्ती हॉल परिसरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या मागणीला यश आले आहे.

प्रभागातील विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून आमदार रवींद्र चव्हाण यांनी या कामांना सातत्याने पाठबळ दिले आहे. उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण तसेच अन्य विकासकामांसाठीही पाठपुरावा सुरू असून, आगामी काळात प्रभागातील विकासकामांना आणखी प्राधान्य देण्यात येणार आहे.

सदर भूमिपूजन कार्यक्रमाला डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली पश्चिम मंडळ सरचिटणीस जयप्रकाश सावंत, कल्याण जिल्हा सहकार सेल अध्यक्ष विनोद म्हात्रे, कल्याण जिल्हा सचिव संजय पाटील, कल्याण जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल म्हात्रे, पश्चिम मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष अपूर्व कदम, डोंबिवली पश्चिम मंडळ युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय कारभारी, प्रेम पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande