विद्यार्थ्यांना ग्रंथालयाशी जोडून वाचन संस्कृतीची चळवळ गतिमान करा : हिंगोली जिल्हाधिकारी
हिंगोली, 04 सप्टेंबर (हिं.स.)। • हिंगोलीच्या अद्ययावत जिल्हा ग्रंथालय इमारतीत मुख्याध्यापकांची विशेष बैठक संपन्न • शिक्षक दिनानिमित्त आठवडाभर भव्य ग्रंथप्रदर्शन शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होणे अत्यंत गर
अ


हिंगोली, 04 सप्टेंबर (हिं.स.)।

• हिंगोलीच्या अद्ययावत जिल्हा ग्रंथालय इमारतीत मुख्याध्यापकांची विशेष बैठक संपन्न

• शिक्षक दिनानिमित्त आठवडाभर भव्य ग्रंथप्रदर्शन

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. पुस्तके माणसाच्या विचारांना प्रगल्भ करतात आणि जीवनाला नवी दिशा देतात. त्यामुळे हिंगोलीतील नूतन जिल्हा ग्रंथालय इमारतीमधील सर्व सोयी-सुविधांचा शालेय विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा. शाळांनी विद्यार्थ्यांना थेट ग्रंथालयाशी जोडून त्यांच्यात वाचनाची घट्ट नाळ निर्माण करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या महसूल कॉलनीतील नूतन व सुसज्ज इमारतीच्या सभागृहात हिंगोली शहरातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची विशेष नियोजन व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री. साखरकर, जिल्हा ग्रंथालय संघ हिंगोली तथा मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पुढे म्हणाले की, आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम वाढत असताना त्यांना पुन्हा पुस्तकांकडे वळवणे ही काळाची गरज आहे. ग्रंथालयात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकेच नव्हे, तर शांत व पोषक वातावरण उपलब्ध होते. प्रत्येक शाळेने दर आठवड्याला रोटेशन पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांची 'ग्रंथालय अभ्यास भेट' घडवून आणावी. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करिअर काउन्सिलिंग, पुस्तक परीक्षण, कथाकथन व सुलेखन यांसारख्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाचा हातभार लावावा. ग्रंथालयाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या सर्व उपक्रमांचा शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याने लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नवीन इमारतीचे पहिले सभासद डॉ. प्रकाश अंभोरे यांचा गौरव :

जिल्हा ग्रंथालय कार्यालय नूतन इमारतीमध्ये स्थलांतरित झाल्यानंतर या अद्ययावत इमारतीतील ग्रंथालयाचे पहिले वाचक सभासद होण्याचा बहुमान डॉ. प्रकाश अंभोरे यांना मिळाला. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते डॉ. प्रकाश अंभोरे यांना ग्रंथभेट व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला व ग्रंथालयाशी जोडल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

मुख्याध्यापिका वंदना विश्वकर्मा यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे शानदार उद्घाटन :

आगामी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात 'ग्रंथप्रदर्शना'चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत, शहरातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रतिनिधी म्हणून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, हिंगोली येथील मुख्याध्यापिका श्रीमती वंदना रामदास विश्वकर्मा यांच्या शुभहस्ते ग्रंथपूजन व फीत कापून करण्यात आले. हे ग्रंथप्रदर्शन पुढील आठवडाभर सर्व नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande