
कोल्हापूर, 4 सप्टेंबर (हिं.स.) : जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य व प्रमुख महामार्गांच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी आगामी 15 दिवसांत हटवावीत. निर्धारित मुदतीत अतिक्रमणे न हटवल्यास संबंधित यंत्रणांना प्रशासनातर्फे कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा, अपघात प्रतिबंधक उपाययोजना आणि महामार्गांवरील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला.
रस्ते अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. अपघातांचे प्रमाण कमी करणे हे मोठ्या प्रमाणात मानवी प्रयत्नांवर अवलंबून आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी रस्ता सुरक्षेच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन अत्यंत काळजीपूर्वक कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राठोड यांनी दिले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच केंद्र सरकारच्या सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या सहकार्याने देशभरातील 100 जिल्ह्यांमध्ये ‘झिरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे.
जिल्ह्यातून राष्ट्रीय, राज्य व प्रमुख महामार्ग जात असून, पोलीस प्रशासनाने अपघातप्रवण 52 ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. या सर्व ठिकाणांची 15 दिवसांत दुरुस्ती पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दुरुस्ती झालेल्या ब्लॅक स्पॉटची पाहणी आपण स्वतः पोलीस अधीक्षकांसमवेत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महामार्गांवरील खड्डे बुजविणे, रोड मार्किंग करणे, डिव्हायडरबाबत सूचना फलक लावणे, सिग्नलची दुरुस्ती करणे, चौकांमध्ये पट्टे मारणे, झाडांच्या फांद्या छाटणे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अतिक्रमणे हटविणे, पावसामुळे उखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, रस्त्यालगतचे विद्युत खांब स्थलांतरित करणे तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या साइड पट्ट्या भरून घेणे, आदी कामे संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देशही राठोड यांनी दिले.
दरम्यान, कागल येथील आरटीओ चेकपोस्ट असलेल्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सिमेंट बॅरिगेट्स लावावेत, अशी सूचना पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केली.
‘राहवीर’ योजनेच्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यांच्या दर्शनी भागात या योजनेची माहिती देणारे फलक लावावेत, अशी सूचना अशासकीय सदस्य विनायक रेवणकर यांनी केली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar