
लातूर, 04 सप्टेंबर, (हिं.स.)। गणेशोत्सव व त्यापाठोपाठ येणाऱ्या नवरात्र उत्सवासाठी विविध तयारीला वेग येत असताना महाहवतरणनेही तात्पुरती वीजजोडणी देण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या तात्पुरत्या वीज जोडणीच्या अधीकृत वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेवूनच विघ्नहर्त्याचा उत्सव आनंदात साजरा करावा, असे आवाहन लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.
विघ्नहर्त्याचा उत्सव अधिकृत वीजजोडणी घेऊनच निर्विघ्नपणे पार पाडा : महावितरणचे आवाहन
गणेश उत्सव व इतर सार्वजनिक उत्सवा अधिकृत करिता वीजपुरवठा घ्यावा. गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता असल्याने मंडळांनी गणेश संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी. मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे. गणेश उत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा
वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यामध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड असल्यास द्यायचा योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा. स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.
गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी.
गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्कीट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८-००२१२३४३५ किंवा १८००२३३-३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis