
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.)। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत ‘भूतबाधे’च्या अफवेमुळे निर्माण झालेली भीती आता हळूहळू कमी होत असून, भीतीपोटी वस्तीगृह सोडून गेलेले विद्यार्थी पुन्हा शाळेकडे परतू लागले आहेत. समुपदेशन, प्रशासनाचा थेट संवाद आणि जनजागृतीमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होण्यास सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी शाळा आणि वस्तीगृह परिसरात भूतबाधा असल्याची अफवा पसरल्यानंतर अनेक विद्यार्थी घाबरले होते. परिस्थिती इतकी गंभीर बनली होती की, वस्तीगृहात राहण्यास विद्यार्थी तयार नव्हते आणि अनेकांनी शाळेतून पलायन केले होते. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. भूतबाधा किंवा अशा प्रकारच्या अफवांना कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्हाधिकारी आशीष येरेकर, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, धारणी येथील प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला तसेच आमदार केवलराम काळे यांनी डोमा येथील आश्रमशाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या मनातील भीती पूर्णपणे दूर व्हावी आणि त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी या मान्यवरांनी तब्बल रात्रभर आश्रमशाळेत मुक्काम केला. विद्यार्थ्यांशी हितगुज करत त्यांना धीर देण्यात आला.
यावेळी संदीप पाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. कीर्तन आणि जनजागृतीच्या माध्यमातून अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी वस्तीगृहात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणामुळे एकही विद्यार्थी राहण्यास तयार नव्हता. मात्र आता परिस्थितीत मोठा बदल दिसून येत असून, १५० हून अधिक विद्यार्थिनी आणि १२५ हून अधिक विद्यार्थी पुन्हा वस्तीगृहात राहू लागले आहेत.
विद्यार्थिनींनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आता त्यांच्या मनातील भीती दूर झाली असून ‘भूत वगैरे काही नसते’, याची जाणीव त्यांना झाली आहे. प्रशासन, शाळा व्यवस्थापन आणि समुपदेशकांच्या प्रयत्नांमुळे डोमा आश्रमशाळेतील भीतीचे वातावरण हळूहळू निवळत असून, शाळेतील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी