
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.)। भांबोरा, कवठाळ, सिंभोरा, येवती कवठाळ शेत शिवारात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला रेस्क्यू करण्यासाठी मोर्शी वनपरिक्षेत्र आणि सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा तसेच धारणी मेळघाट यांच्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या नरभक्षक वाघिणीने भांबोरा येथील एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर आणि कवठाळ येथे पशुधनावर हल्ला केल्यानंतर वनविभागाने या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कृती आराखडा तयार केला आहे.परतवाडा धारणी अमरावती येथून तज्ज्ञ रेस्क्यू टीम, तीन चार शार्प शूटर आणि पशुवैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक ट्रॅप कॅमेरे, वाघाचा वावर असलेल्या परिसरात बसविलेले असून वनपरिक्षेत्र अधिकारी मगर मॅडम स्वतः आपल्या टीम सोबत दिवस-रात्र फिल्डवर उपस्थित राहून संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून आहेत. त्यांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जंगलात गस्त घालत आहेत.वनविभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाघीण अत्यंत चतुर आणि अनुभवी आहे. ती सतत आपला मार्ग बदलत असून, मानवी वस्ती आणि जंगलाच्या सीमेवर लपून वनविभागाच्या टीमची दिशाभूल करीत आहे. तरीही वनविभागाने तिच्या मागचा थांग सोडलेला नाही.रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना काही नागरिक घटनास्थळी गर्दी करतात, फटाके फोडतात आणि सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवतात. त्यामुळे वाघीण घाबरून आणखी हिंस्त्र होते आणि जंगलात पळून जाते. यामुळे रेस्क्यूला अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे मोर्शीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मगर यांनी हात जोडून आवाहन केले आहे की शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणू नये, त्यांना पूर्ण सहकार्य करावे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरील खोट्या अफवांपासून सावध राहावे. सकाळी लवकर आणि संध्याकाळी उशिरा शेतात एकट्याने जाऊ नये. शेतात जाताना गटाने जावे आणि सावधगिरी बाळगावी गुराख्यांनी आपली गुरे जंगलाच्या जास्त आत नेणे टाळावे वाघीण दिसल्यास तिला घाबरवण्याचा किंवा पळवून लावण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वनविभागाच्या 1926 टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.वनविभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून, लवकरच या नरभक्षक वाघिणीला सुरक्षितपणे रेस्क्यू करून या दहशतीतून शेतकऱ्यांची मुक्तता केली जाईल, असा विश्वास मगर यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी