
ड्राय पोर्ट जोडणी, शटल रेल्वे, नवीन एमआयडीसी आणि नियोजित नागरी विकासावर भर
छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : जालना जिल्ह्याच्या भविष्यातील औद्योगिक व सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासनाकडे चार प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये जालना ड्राय पोर्टला शेंद्रा-बिडकीन मार्गिकेशी जोडणारा रस्ता, जालना-छत्रपती संभाजीनगर शटल रेल्वे सेवा, नवीन एमआयडीसी टप्प्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे आणि सिडकोच्या नेतृत्वाखाली नियोजित नागरी विकासाचा समावेश आहे.
‘जालना विकासाचे प्रवेशद्वार’ या संकल्पनेवर आधारित औद्योगिक परिषदेत जिल्ह्याच्या औद्योगिक, कृषी-प्रक्रिया, लॉजिस्टिक्स, ऑटोमोबाईल, पोलाद, वाइन, पर्यटन तसेच रेशीम उद्योगातील गुंतवणुकीच्या संधींवर सविस्तर चर्चा झाली. एमएमएलपी आणि ड्राय पोर्टच्या माध्यमातून जालना तसेच संपूर्ण मराठवाड्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याची मोठी क्षमता निर्माण होणार असल्याचे परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
जालना राष्ट्रीय बंदर जाळ्याशी जोडले जाऊन एक्झिम व्यापारासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार बनू शकते, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास, औद्योगिक विस्तार आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला चालना मिळाल्यास जालन्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळू शकते, यावरही परिषदेत भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. गोविंद गोयल यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रितेश मिश्रा यांनी जालना जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीचा आढावा घेतला, तर ‘जालना फर्स्ट’च्या अध्यक्षांनी स्वागतपर भाषण केले. धवल मिश्रिकोटकर यांनी परिषदेची उद्दिष्टे स्पष्ट केली.
जिल्ह्याच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा ‘द चेंजमेकर्स’ म्हणून गौरव करण्यात आला. परिषदेसाठी सेंट-गोबेन हे भागीदार असून एआरबी बेअरिंग्स आणि चॉयस कन्सल्टन्सी यांनी सहकार्य केले.
दरम्यान, परिषदेत सहभागी प्रतिनिधींनी एमएमएलपी आणि जालना ड्राय पोर्टला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. टोयोटा, एंड्यूरन्स टेक्नॉलॉजीज, एलजीबी, बजाज, गरवारे, सेंट-गोबेन, लॉयड्स मेटल्स, महिको यांसह विविध उद्योगसमूहांचे प्रतिनिधी तसेच जेएनपीए, एमआयडीसी, भारतीय रेल्वे, एनएचएलएमएल, इंडियन ऑयल कॉर्पोरेशन, प्रमुख बँका, उद्योजक, गुंतवणूकदार, लॉजिस्टिक्स कंपन्या, व्यापार संघटना आणि शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी परिषदेला उपस्थित होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis