
पालकमंत्र्यांनी फोनवरून केले सांत्वन
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.) | अमरावती शहरातील रविनगर चौकात १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी शर्वरी गणेश हाळके हिची करण्यात आलेली निर्घृण हत्या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या दुःखाच्या प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने दूरध्वनीवरून हाळके कुटुंबाशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात शासन कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे आश्वस्त केले. घटनेचे गांभीर्य ओळखून राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे, विधान परिषदेचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी तात्काळ मृत शर्वरीच्या घरी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
राजापेठ पोलीस ठाण्यात भेट; आरोपीवर कठोर कारवाईची मागणीकुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी थेट राजापेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे उपस्थित पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांच्यासह अन्य पॉलिसी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी घटनेचा कसून तपास करण्याची आणि आरोपीला लवकरात लवकर गजाआड करण्याची जोरदार मागणी केली.
हा प्रकार अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. अशा गुन्हेगारांना समाजात कोणतीही जागा नसून आरोपीला लवकरात लवकर अटक करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे, जेणेकरून शर्वरीला न्याय मिळेल, असे निर्देश बोंडे पोटे यांनी पोलिसांना दिले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पोलीस प्रशासनाला दूरध्वनीवरून स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या घटनेतील आरोपीला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोरातील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी