
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हुडकोच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. हुडको मुंबई क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी निरीक्षक श्री. मुरली कृष्ण जामि यांनी अमरावती महानगरपालिकेच्या बैठकीत हुडकोच्या कार्याची माहिती देताना शहराच्या विकासासाठी भागीदारी करण्याची तयारी दर्शविली.अमरावती महानगरपालिकेने संधी दिल्यास हुडकोच्या माध्यमातून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांसाठी योजनांची आखणी करण्यात येईल. तसेच या योजनांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून त्या यशस्वीपणे राबविण्याचा मानस श्री. जामि यांनी व्यक्त केला.यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी हुडकोच्या कार्याचे कौतुक केले. हुडकोने यापूर्वी अनेक महत्त्वपूर्ण विकास योजना यशस्वीपणे राबविल्या असून, अमरावती शहराच्या विकासासाठीही हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे त्यांनी सांगितले. अमरावती शहराला संपूर्ण महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी हुडकोच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील. तसेच राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरावा करता येईल, असेही डॉ. बोंडे यांनी स्पष्ट केले.या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, सभागृह नेता चेतन गावंडे यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
अमरावती शहरातील पायाभूत सुविधा, नागरी विकास आणि विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांना गती देण्यासाठी हुडकोची भागीदारी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास सन्मा.नगरसेवक व नगरसेविका, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी