
नाशिक, 04 सप्टेंबर (हिं.स.)। उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच संतप्त नातेवाईकांसह अनोळखी इसमांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करून अतिदक्षता विभागाचे नुकसान केल्याची घटना पंचवटीत घडली.
याबाबत आयुष प्रवीण तायडे (रा. विघ्नहर्ता अपार्टमेंट, पंचवटी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. तायडे हे निमाणी बस स्टॅण्डसमोरील आयुष हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. १ सप्टेंबर रोजी आयुष हॉस्पिटलमध्ये औषधोपचारासाठी दाखल असलेल्या रत्ना सचिन जैन (वय ३७, रा. प्रीती अपार्टमेंट, पंचवटी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती रुग्णाच्या नातेवाईकास कळताच रुग्णाचे नातेवाईक सचिन जैन, जितेंद्र पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी इसमांनी सायंकाळच्या सुमारास डॉक्टर कृष्णा यादव यांच्या बाह्यरुग्ण विभागाच्या केबिनमध्ये प्रवेश करून रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. अतिदक्षता विभागात व रुग्णालयाच्या आवारात विनापरवानगी प्रवेश करून आरडाओरडा करीत शिवीगाळ केली, तसेच कर्तव्यावर असलेले डॉ. अक्षय पाटील व डॉ. मिलिंद पाटील यांना हाताच्या चापटीने मारहाण केली व हॉस्पिटलमधील कर्मचारी दीप्तेश दोंदे, दुर्गेश बच्छाव, प्रशांत धुमाळ व फिर्यादी तायडे यांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच अतिदक्षता विभागाच्या काचा फोडून रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI