
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
घरातील जुन्या संदुकीत,देवघरात किंवा पिढ्यान्पिढ्या जपलेल्या संग्रहात एखादा प्राचीन हस्तलिखित ग्रंथ असेल,तर तो केवळ एका कुटुंबाचा ठेवा नसून देशाच्या ज्ञानपरंपरेतील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. अशा विखुरलेल्या अमूल्य हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंद,जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत ‘ज्ञान भारतम् मिशन’ हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारशाचा शोध,सर्वेक्षण,दस्तऐवजीकरण,जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे हा ‘ज्ञान भारतम् मिशन’चा प्रमुख उद्देश आहे.देशात तत्त्वज्ञान,विज्ञान, वैद्यकशास्त्र,गणित,खगोलशास्त्र, साहित्य,कला,प्रशासन तसेच विविध पारंपरिक ज्ञानप्रणालींशी संबंधित असंख्य प्राचीन हस्तलिखिते उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक हस्तलिखिते आजही खासगी कुटुंबे,मंदिरे,मठ,ग्रंथालये, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संस्थांकडे जतन करून ठेवण्यात आली आहेत.
या अमूल्य ज्ञानवारशाचा शोध घेऊन त्याचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ज्ञान भारतम् राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण’ सुरू केले आहे.या सर्वेक्षणाद्वारे देशभरात उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांची तसेच ती कोणत्या ठिकाणी आहेत,याची माहिती संकलित केली जाणार आहे. त्याआधारे राष्ट्रीय स्तरावर सर्वसमावेशक माहिती प्रणाली तयार करण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.
कोणताही नागरिक होऊ शकतो सहभागी
‘ज्ञान भारतम्’ उपक्रमात कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो.आपल्या कुटुंबाकडे, गावात,मंदिरात,मठात, ग्रंथालयात,शैक्षणिक संस्थेत किंवा परिसरात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असतील अथवा अशा हस्तलिखितांविषयी माहिती असेल, तर ती या राष्ट्रीय उपक्रमासाठी नोंदविता येणार आहे.
हस्तलिखितांविषयी उपलब्ध असलेली प्राथमिक माहिती ‘Gyan Bharatam Mobile Application’ तसेच अधिकृत डिजिटल माध्यमातून नोंदविता येईल. नोंदणी करताना उपलब्धतेनुसार हस्तलिखित असलेले ठिकाण, हस्तलिखितांची अंदाजे संख्या,मालकी किंवा जतनकर्त्यांची माहिती, हस्तलिखिताविषयी उपलब्ध प्राथमिक माहिती आणि आवश्यकतेनुसार हस्तलिखिताचे छायाचित्र अशी माहिती देता येणार आहे.
मालकी हक्कावर कोणताही परिणाम नाही
या सर्वेक्षणातील सहभाग पूर्णपणे स्वेच्छेचा आणि गैर-हस्तक्षेपी स्वरूपाचा आहे.हस्तलिखिताची माहिती दिल्यामुळे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेच्या मालकी हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच केवळ सर्वेक्षणात सहभाग नोंदविला म्हणून संबंधित हस्तलिखित हस्तांतरित करणेही आवश्यक नाही.संकलित माहितीच्या आधारे संबंधित हस्तलिखितांची ओळख आणि पडताळणी केली जाईल.त्यानंतर तपशीलवार दस्तऐवजीकरण तसेच आवश्यकतेनुसार हस्तलिखितांचे संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
हस्तलिखित कार्यालयात जमा करण्याची गरज नाही
नागरिकांकडे असलेली हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.संबंधित हस्तलिखित ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून अपलोड केल्यानंतर ते कोणत्याही कार्यालयात जमा किंवा ठेवण्याची आवश्यकता नाही.मूळ हस्तलिखित नागरिकांनी स्वतःकडेच सुरक्षितपणे जपून ठेवायचे आहे. आपल्याकडे एखादे हस्तलिखित उपलब्ध असल्यास किंवा आपल्या परिसरातील हस्तलिखितांविषयी माहिती असल्यास ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून अथवा ज्ञान भारतम् या अधिकृत संकेतस्थळावरून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होता येणार आहे.
‘ज्ञान भारतम्’ उपक्रमातून भारताच्या अमूल्य हस्तलिखित वारशाचे भावी पिढ्यांसाठी जतन करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा वारसा संशोधन आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.त्यामुळे नागरिक,विद्यार्थी, संशोधक,विद्वान,ग्रंथालये, शैक्षणिक संस्था,मंदिरे,मठ तसेच हस्तलिखितांचे खासगी जतनकर्ते यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), संबंधित तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.भारताच्या अमूल्य ज्ञानवारशाच्या शोध,नोंदणी आणि जतनासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
एका नजरेत ‘ज्ञान भारतम्’
प्राचीन हस्तलिखितांचा शोध आणि सर्वेक्षण
हस्तलिखितांचे दस्तऐवजीकरण, जतन व संवर्धन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन नागरिक,विद्यार्थी, संशोधक,संस्था,मंदिरे व मठांना सहभागी होता येणार आहे. हस्तलिखिताची माहिती दिल्याने मालकी हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही. हस्तलिखित कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही; मूळ हस्तलिखित संबंधित नागरिकाकडेच राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis