
नाशिक, 04 सप्टेंबर (हिं.स.)। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मोबाईल हॅक झाल्यानंतर खासदारांच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेक व्यक्तींना व्हॉट्सपवरून पैसे पाठविण्याची मागणी करणारे मेसेज पाठवण्यात आले. काहींना 'माझ्या खात्यात ६२ हजार रुपये जमा करा, मी दोन तासांत परत करेन', असा मेसेज पाठवण्यात आला. तर काहींना 'हेल्प मी' असे संदेश आल्याने संबंधित व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडाली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खा. डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल त्यांच्याकडे नसून त्यांचा पीएकडे होता. त्याचवेळी एका व्यक्तीचा फोन आला. 'तुमचे कुरिअर आले आहे, मात्र पत्ता सापडत नाही. तुम्हाला एक लिंक पाठवली आहे, ती तपासा,' असे फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितल्याचे समोर आले आहे. यानंतर संबंधित लिंक उघडल्यानंतर काही वेळातच खासदारांचा मोबाईल हॅक झाल्याचा प्रकार समोर आला. मोबाईल हॅक झाल्यानंतर सायबर फसवणूक करणा-यांनी खासदारांच्या नावाने त्यांच्या संपर्कातील अनेक व्यक्तींना मेसेज पाठवून पैशांची मागणी सुरू केली.
मोबाईल हॅक झाल्याचे समजताच खा. डॉ. शोभा बच्छाव यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तांत्रिक तपास सुरू केला. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर डॉ. शोभा बच्छाव यांचा मोबाईल पुन्हा सुरक्षित करण्यात सायबर पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा सायबर फसवणुकीचा धोका अधोरेखित झाला आहे. कुरिअर, बँक, सरकारी संस्था किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने येणारे संशयास्पद फोन, मेसेज किंवा लिंक याबाबत नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. खासदारांच्या मोबाईलमधूनच त्यांच्या परिचितांना पैसे मागणारे मेसेज गेल्याने अनेकांची दिशाभूल होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वेळीच काही व्यक्तींनी खासदारांशी संपर्क साधल्याने हा प्रकार उघडकीस आला आणि सायबर पोलिसांनी हस्तक्षेप करत मोबाईल सुरक्षित केला. या प्रकरणात मोबाईल हॅक करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI