
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा, मात्र तोडगा अद्याप नाही.
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असतानाच राज्य सरकारचे शिष्टमंडळ गुरुवारी रात्री आंतरवाली सराटीत दाखल झाले. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
यावेळी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसह सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीचा मुद्दा आणि उर्वरित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळामध्ये झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, चर्चा सकारात्मक झाली असली तरी अद्याप कोणताही अंतिम निर्णय किंवा ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
सातारा गॅझेटसह मराठा समाजाच्या उर्वरित मागण्यांची पूर्तता करण्याबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळासमोर मांडली. सरकारकडून या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis