
बीड, 04 सप्टेंबर (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बीड जिल्हास्तरीय युवक महोत्सव ५ सप्टेंबर रोजी सिरसाळा येथील पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात होणार आहे. या महोत्सवात ७२ महाविद्यालांचे ५६६ युवक कलावंत सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.
महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपात महोत्सवाचा उदघाटन समारंभ सकाळी १० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री, परळीचे आमदार धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार व्यंकटराव कदम असतील. यावेळी संस्थेचे सचिव योगेश कदम, उपाध्यक्ष नंदकुमार सारडा, सरपंच नसीब शेख, संचालक डॉ.कैलास अंभुरे, प्राचार्य डॉ.अनंत जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहील. पारितोषिक वितरण ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होईल. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आ. सतीश चव्हाण, डॉ. शिवाजी मदन, ग्लोबल विकास ट्रस्टचे मयंक गांधी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी नोव्हेंबर २००९ मध्ये तत्कालीन प्राचार्य डॉ मुंजभाऊ धोंडगे यांनी जिल्हा युवक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले. या दोन दिवसीय महोत्सवात वक्तृत्व, नृत्य, गायन, नाट्य, चित्रकला, वादविवाद, प्रश्नमंजुषा यासह २५ हून अधिक कला प्रकारात बीड जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कैलास अंभुरे, प्राचार्य डॉ. अनंत जाधव, आणि समिती प्रमुख प्रा. समाधान इंगळे, डॉ मुंजाभाऊ धोंडगे, डॉ हरिभाऊ कदम आदी
परिश्रम घेत आहेत.
७२ महाविद्यालयांचे ५६६ कलावंत
बीड जिल्हास्तरीय युवक महोत्सवात ७२ महाविद्यालयाचे ५६६ कलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये २५० मुले तर ३१६ मुलींचा समावेश आहे. महाविद्यालयात उभारण्यात येणा-या पाच रंगमंचावर ही स्पर्धा होईल. प्रत्येक कलाप्रकारात विजेते तीन संघ ऑक्टोबर महिन्यात होणा-या केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी होणार आहेत, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis