
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे महसूल विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण २०२६ राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांची मतदार यादी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, दावे व हरकती स्वीकारण्याच्या टप्प्यात त्यांचे ८ ते १० सप्टेंबरदरम्यान जिल्हानिहाय दौरे होणार आहेत.
दौऱ्याच्या एक दिवस आधी संबंधित जिल्ह्याचे नोडल अधिकारी जिल्ह्यात भेट देऊन प्राथमिक तपासणी तसेच आवश्यक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर मतदार यादी निरीक्षकांकडून संबंधित जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेची तपासणी केली जाणार आहे.दौरा कार्यक्रमानुसार, ८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे सकाळी आणि सांगली येथे दुपारी, ९ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे सकाळी आणि सातारा येथे दुपारी, तर १० सप्टेंबर रोजी पुणे येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.नोडल अधिकाऱ्यांना निरीक्षकांच्या भेटीपूर्वी संबंधित जिल्ह्यात उपस्थित राहून भारत निवडणूक आयोगाच्या पहिल्या भेटीसाठीच्या चेकलिस्टनुसार सर्व बाबींची पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची उपलब्धता, दावे-हरकतींच्या अर्जांची स्थिती तसेच SVEEP उपक्रमांची अद्ययावत माहिती यांचा समावेश आहे.मतदार यादी निरीक्षकांच्या दौऱ्यात संबंधित जिल्ह्यातील विद्यमान खासदार, आमदार आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेण्यात येणार आहे. याशिवाय सर्व संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची आढावा बैठक होणार असून, काही मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन कामकाज आणि अर्ज वितरणाच्या स्थितीची पाहणी केली जाणार आहे.ही माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड