
छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सोयगाव खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजूभाऊ राठोड यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी हनुमंतखेडा, ता. सोयगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थित राहून शिवसेनेचे निष्ठावंत योद्धा राजूभाऊ राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने शिवसेनेने एक निष्ठावंत, लढवय्या आणि धडाडीचा कार्यकर्ता गमावला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.राजूभाऊ राठोड यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. पक्षासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांची कार्यपद्धती कायम स्मरणात राहील, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले.“राजूभाऊ, तुमच्या आठवणी सदैव मनात जिवंत राहतील,” अशा शब्दांत आमदार सत्तार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis