नवनीत राणांवर बोलल्याशिवाय काहींची प्रसिद्धी होत नाही - रवी राणा
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.) | अमरावतीमध्ये हनुमान गढी उभारली जात असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून अमरावतीत येणारे काही लोक खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करूनच प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची जोरदार टीका आमदार रवी राणा यांनी नाव न घेता
नवनीत राणा - रवी राणा


अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.) | अमरावतीमध्ये हनुमान गढी उभारली जात असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून अमरावतीत येणारे काही लोक खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करूनच प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची जोरदार टीका आमदार रवी राणा यांनी नाव न घेता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केली.

अमरावतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना रवी राणा म्हणाले की, देशातून कुठूनही कोणी अमरावतीत आले की, ते नवनीत राणा यांच्याबाबत बोलल्याशिवाय राहत नाहीत. मात्र, नवनीत राणा यांचे नाव घेतले नाही, त्यांच्यावर टीका केली नाही, तर टीव्हीवर प्रसिद्धी मिळत नाही, हे काहींना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.यावेळी राणा यांनी धर्म आणि संस्कृतीच्या मुद्द्यावरही आक्रमक भूमिका मांडली. “आमच्या धर्मावर आणि संस्कृतीवर टीका करू नका. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी आम्हालाच पुढे यावे लागेल. आपल्या धर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार व संरक्षण करण्यासाठी बाहेरून कोणी येणार नाही,” असे ते म्हणाले.

धर्म आणि संस्कृतीबाबत सातत्याने टीका करणाऱ्यांना इशारा देताना राणा यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. “आमच्या धर्मावर कोणी बोट दाखवत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही,” असे सांगत त्यांनी धर्माविरोधात वक्तव्य करणाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. अमरावतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या हनुमान गढीच्या पार्श्वभूमीवर राणा यांनी हिंदू धर्म, संस्कृती आणि श्रद्धास्थानांच्या संरक्षणासाठी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली. नवनीत राणा यांच्यावर सातत्याने टीका करून राजकीय प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी जनतेसमोरील खरे प्रश्न मांडावेत, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला. राणा यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून, त्यांच्या टीकेला सुषमा अंधारे किंवा इतर विरोधकांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande