जालना जिल्ह्यातील शाळांची सात तारखेपर्यंत पाहणी करा - पंकजा मुंडे
वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पाणी व क्रीडांगणांच्या सुविधांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कंपाऊंड वॉल आदी
जालना जिल्ह्यातील शाळांची सात तारखेपर्यंत पाहणी करा - पंकजा मुंडे


वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पाणी व क्रीडांगणांच्या सुविधांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कंपाऊंड वॉल आदी सुविधांची सद्यःस्थितीची पाहणी करून येत्या ७ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आदर्श शाळा, अंगणवाडी, आधुनिक ग्रंथालये आणि क्रीडांगणांच्या विकासाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्यांची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच ‘जालनाई सिल्क’ ब्रँडिंगच्या कामाचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया, जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा उपस्थित होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्यासह इतर अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

जिल्हा परिषद शाळांमधील नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, जुन्या वर्गखोल्यांची दुरुस्ती, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचा आढावा घेण्यात आला. तसेच शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारतींची सद्यःस्थिती, आवश्यक दुरुस्ती, उपलब्ध निधी आणि प्रलंबित कामांची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

निधी मंजूर असूनही निविदा प्रक्रिया अथवा प्रशासकीय कार्यवाही वेळेत पूर्ण न झाल्याने निधी अखर्चित राहणे स्वीकारले जाणार नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असा इशारा मुंडे यांनी दिला. पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील अंगणवाडी व ग्रामपंचायत इमारतींचाही आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

डिजिटल आणि बालस्नेही शाळांवर भर

जालना जिल्ह्यात शाळांच्या डिजिटलायझेशनसह आदर्श शाळा उपक्रमासाठी निधी उपलब्ध आहे. या निधीतून अस्तित्वातील अधिकाधिक शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर द्यावा. शाळांमध्ये रंगरंगोटी, आवश्यक दुरुस्ती, बालस्नेही सजावट, डिजिटल वर्गखोल्या, दर्जेदार बाके, पुस्तके आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे मुंडे यांनी सांगितले.

शाळांच्या भिंतीवरील चित्रे आणि संदेश केवळ सजावटीपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये समता, सामाजिक सलोखा, सर्वसमावेशकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारे असावेत. पंचतंत्रातील कथा, संत-महापुरुषांचे विचार, प्रेरणादायी प्रसंग आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या चित्रांचा समावेश करावा. स्थानिक संस्कृती आणि परिसराशी सुसंगत बालस्नेही संकल्पना विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

क्रीडांगणांचा नियमित वापर करण्याचे निर्देश

शाळांमधील उपलब्ध मैदाने वापराविना पडून राहू नयेत. मैदानांवर मऊ लाल माती टाकून खो-खो, कबड्डी, मल्लखांब आणि बॅडमिंटन यांसारख्या खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडांगणांचा नियमित वापर होईल, याचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शाळांमध्ये तंबाखू अथवा मद्याचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेने पथक तयार करून वेळोवेळी पाहणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

आदर्श शाळेत वाचनालय, किचन गार्डन आणि सीसीटीव्ही

आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, किचन गार्डन, सुरक्षित हरित कुंपण, वृक्षारोपण, सीसीटीव्ही यंत्रणा आणि अखंडित वीजपुरवठा असावा. डिजिटल वर्गखोल्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन आणि परस्परसंवादी शिक्षण मिळाले पाहिजे, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांना व्यावसायिक दराने वीजबिल आकारल्यास मर्यादित अनुदानातून हा खर्च भागविणे कठीण होते. त्यामुळे अंगणवाडी आणि शैक्षणिक संस्थांसाठी स्वतंत्र अथवा सवलतीचा वीजदर लागू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

नगरपालिका शाळांसाठी स्वतंत्र आराखडा

जालना नगरपालिकेच्या सध्या १६ शाळा आहेत. विद्यार्थीसंख्येच्या आधारे शाळांची संख्या निश्चित करण्याची गरज आहे. विद्यार्थीसंख्या, इमारतींची सद्यःस्थिती, झोपडपट्टी व वंचित वस्त्यांची ठिकाणे तसेच विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ या बाबींचा अभ्यास करून नगरपालिका शाळांच्या सुधारणेसाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, अशा सूचनाही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande