ऊसावरील ‘पायरीला’ किडीचे वेळीच व्यवस्थापन करावे – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
नांदेड, 04 सप्टेंबर (हिं.स.)।ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम करणाऱ्या ‘पायरीला’ अथवा पानावरील तुडतुडा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क होऊन पिकाची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. पायरीला किडीची
ऊसावरील ‘पायरीला’ किडीचे वेळीच व्यवस्थापन करावे – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी


नांदेड, 04 सप्टेंबर (हिं.स.)।ऊस पिकाच्या वाढीवर व उत्पादनावर परिणाम करणाऱ्या ‘पायरीला’ अथवा पानावरील तुडतुडा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क होऊन पिकाची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. पायरीला किडीची पिल्ले व प्रौढ कीटक पानातील रस शोषत असल्याने पाने पिवळसर पडतात. तसेच किडीमुळे साचणाऱ्या चिकट मधासारख्या पदार्थावर काळी बुरशी वाढल्याने प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया बाधित होऊन ऊसाची वाढ व उत्पादन घटू शकते. त्यामुळे प्रादुर्भावाची सुरुवातीची लक्षणे दिसताच रासायनिक नियंत्रणाची घाई न करता एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान एकदा पिकाची पाहणी करावी. विशेषतः पानांच्या खालच्या बाजूस पायरीलाची पिल्ले, प्रौढ कीटक व अंडीपुंज तपासावेत. शेताच्या बांधावरील तसेच दाट वाढलेल्या उसातील प्रादुर्भावाची प्रथम तपासणी करावी. पिकामध्ये प्रादुर्भावाची सुरुवात दिसताच आवश्यक नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

सर्वेक्षण व देखरेख : पायरीला किडीच्या निरीक्षणासाठी पिकाच्या शेंड्यापासून 15 सें.मी. उंचीवर प्रति 5 एकर एक प्रकाश सापळा लावावा. हे सापळे सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. तसेच शेतातील वेगवेगळ्या ठिकाणच्या 10 ऊसावरील 20 पानांची पाहणी करून पिल्ले, प्रौढ कीटक व अंडीपुंजांची संख्या नोंदवावी. प्रति पान 3 ते 5 पिल्ले किंवा प्रौढ अथवा 1 अंडीपुंज आढळल्यास ती आर्थिक नुकसान पातळी मानावी.

एकात्मिक व्यवस्थापन : ऊसाचे शेत एकदल तणांपासून स्वच्छ ठेवावे. उसाच्या खालची वाळलेली पाने (पाचट) काढून टाकावीत, कारण त्यावर पायरीलाची अंडी असू शकतात. नत्राचा अतिरेकी वापर टाळून पिकास योग्य प्रमाणात स्फुरद व पालाश द्यावे. पानांच्या मागील बाजूस आढळणारे पांढऱ्या कापसासारखे अंडीपुंज हाताने गोळा करून नष्ट करावेत. शक्य असल्यास सकाळच्या वेळी उसाची पाने हलवून प्रौढ व पिल्ले खाली पाडून नष्ट करावीत. पक्व झालेला ऊस शक्य तितक्या लवकर कापून घ्यावा.

जैविक नियंत्रणाला प्राधान्य : पायरीला किडीच्या नियंत्रणासाठी इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या नैसर्गिक शत्रूचा वापर करावा. शेतात इपिरिकॅनियाचा प्रादुर्भाव आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये. इपिरिकॅनियाचे ४ हजार ते ५ हजार कोश किंवा ४ ते ५ लाख अंडी प्रति एकरी सोडावीत. जास्त परजीवीकरण झालेल्या शेतातून इपिरिकॅनिया गोळा करून कमी परजीवीकरण झालेल्या शेतात सोडावे. तसेच ढालकिडे, लेसविंग, सिरफिड माशी व कोळी यांसारख्या नैसर्गिक शत्रूंचे संरक्षण करावे.

नैसर्गिकरित्या मेटारायझियम अॅनिसोपली या बुरशीने बाधित झालेल्या पायरीलाचा वापर जैविक नियंत्रणासाठी करता येतो. अशा बाधित प्रौढ पायरीला गोळा करून इतर बाधित शेतात सोडावेत. इपिरिकॅनियाचे जिवंत कोश व अंडीपुंज असलेली पाने तसेच जिवंत कोश असलेले पाचट जाळू नये; ते पायरीला प्रादुर्भाव असलेल्या शेतात सोडावे.

रासायनिक नियंत्रण : जैविक शत्रू उपलब्ध नसतील आणि पायरीला किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असेल, तरच शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी क्लोरपायरीफॉस 20 टक्के ईसी 1500 मिली प्रति हेक्टर 500 ते 1000 लिटर पाण्यात किंवा अॅसिफेट 50 टक्के + इमिडाक्लोप्रिड 1.80 टक्के एसपी 2500 ग्रॅम प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पायरीला कीड दिसताच रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीची घाई करू नये. प्रथम पिकाचे निरीक्षण करून अंडीपुंज व बाधित पाने नष्ट करावीत, नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन करावे आणि जैविक नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. प्रादुर्भाव तीव्र झाल्यासच शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande