विद्यानंद बापटांना झालेल्या मारहाणीचा बीडमध्ये निषेध
बीड, ४ सप्टेंबर (हिं.स.) : डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठविणारे पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना संतोष चव्हाण नामक व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून द
अ


बीड, ४ सप्टेंबर (हिं.स.) : डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात आवाज उठविणारे पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना संतोष चव्हाण नामक व्यक्तीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांच्या अटकेची चौकशी करून कारवाईबाबत फेरविचार करावा, या मागण्यांसाठी शुक्रवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे प्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचार आणि गैरप्रकारांविरोधात आवाज उठवत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यांना पोलिसांनी मध्यरात्री अटक करून पाच दिवसांची पोलीस कोठडी दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. ही कारवाई लोकशाही मूल्यांना बाधक असून सरकारच्या दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दिला.

त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘प्रशासनाच्या दडपशाहीचा धिक्कार असो’, ‘संतोष पंडित यांची अटक रद्द करा’ आणि ‘ध्वनीप्रदूषणावर आळा घाला’ अशा घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन देण्यात आले. विद्यानंद बापट यांच्यावरील कथित मारहाणीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संतोष पंडित यांच्या अटकेची चौकशी करून त्यांच्यावरील कारवाईबाबत फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

ध्वनिप्रदूषणाविरोधात संरक्षणाची मागणी

डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण मिळावे, तसेच सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचे बीड जिल्हाध्यक्ष किष्किंधा पांचाळ, इंटक बीडचे जिल्हाध्यक्ष रामधन जमाले, आम आदमी पार्टीचे बीड शहराध्यक्ष सादेक सय्यद, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख प्राचार्य डॉ. डी. जी. तांदळे, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय तांदळे, व्यसनविरोधी प्रमुख बीडचे अध्यक्ष बाजीराव ढाकणे आदी सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande