राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून घेतली उडी
दोघांचा जागीच मृत्यू, जुळ्या मुलींपैकी एकीचा उपचारादरम्यान मृत्यू छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह ऐत
प्रसिद्ध महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ


प्रसिद्ध महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ


दोघांचा जागीच मृत्यू, जुळ्या मुलींपैकी एकीचा उपचारादरम्यान मृत्यू

छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून 100 फूट खोल दरीत उडी घेतली आहे. या थरकाप उडवणाऱ्या घटनेत कुस्तीपटू अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी क्रांती नावाच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच जुळ्या मुलींपैकी दुसरी मुलगी वीरा ही गंभीर जखमी असून, तिच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत.

अश्विनी पौळ यांच्या वडिलांचा धक्कादायक आरोप

पती आणि सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक तसेच शारीरिक त्रासाला कंटाळूनच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी केला आहे. या आरोपामुळे या घटनेला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिकारी सखोल तपास करत आहेत.

दरम्यान, अश्विनी मोहिते अर्थात विवाहानंतर अश्विनी मनोहर पौळ या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील व्हंताळ गावच्या रहिवासी होत्या. अश्विनी पौळ 'एमएसएफ'मध्ये नोकरीला होत्या. त्यांचे पती मनोहर रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पती मनोहर पौळ यांच्या सांगण्यावरुन अश्विनी पौळ यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला होता.

कोण होत्या अश्विनी पौळ?

अश्विनी मनोहर पौळ असे या महिला कुस्तीपटूचे पूर्ण नाव होते. कुस्तीच्या क्षेत्रात त्यांची ओळख ‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी निर्माण झाली होती. राष्ट्रीय स्तरावर आपल्या कुस्तीच्या कौशल्याची छाप पाडणाऱ्या अश्विनी पौळ यांनी आपल्या कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकांची कमाई करत महाराष्ट्राचा गौरव वाढवला. त्या राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या महिला कुस्तीपटू होत्या. कुस्तीचे प्राथमिक धडे त्यांना आपल्या कुटुंबातूनच मिळाले. मुलीला सरावासाठी योग्य वातावरण मिळावे, यासाठी त्यांच्या वडिलांनी घरातच कुस्तीची तालीम सुरू केली होती. त्यांनी 2007 मध्ये केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर 2008 व 2009 मध्ये पंजाबमधील गुरुदासपूर आणि चेन्नई येथील राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. याशिवाय 2010 मध्ये भोपाल, कानपूर आणि हरियाणा, तसंच बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि सैफई (लखनऊ) येथील राष्ट्रीय स्पर्धा गाजवत संपूर्ण कारकिर्दीत 5 सुवर्ण आणि 6 रौप्य पदकांवर आपलं नाव कोरलं आहे. अश्विनी पौळ यांनी मुलांना घेऊन आत्महत्याचं पाऊल उचललेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि क्रीडा जगतातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande