
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिने उलटले तरी बार्शी तालुक्यासह वैराग परिसरातील अनेक गावांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून, दहिटणे, मुंगशी, सासुरे, राळेरास, शेळगाव, तडवळे, यावली, ढोराळे आणि इर्ले परिसरातील शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीन पिकावर रोटर फिरवण्यास सुरुवात केली आहे.
दमदार पाऊस होईल, या अपेक्षेवर अनेक शेतकऱ्यांनी यंदा उशिराने खरीप पिकांची पेरणी केली. सुरुवातीला पेरणी झालेल्या शेतांमधील उडीद आणि सोयाबीनची पिके सध्या फुलोऱ्यात आली आहेत. मात्र, या निर्णायक टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे.पावसाअभावी सोयाबीन, मूग आणि उडीद पिके करपली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी केलेले प्रयत्नही अपुरे ठरत आहेत. त्यामुळे खर्च करून उभे केलेले पीक वाया जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.दरम्यान, पावसाची प्रतीक्षा कायम राहिल्याने बार्शी तालुक्यातील खरीप हंगामाचे भवितव्य अधांतरी झाले आहे. पिकांवर रोटर फिरवण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली असून, प्रशासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड