
पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे प्रगत तंत्रज्ञान असले तरी त्याला काही मर्यादा आहेत. स्वतःच्या बुद्धिकौशल्यावर विश्वास ठेवून काम केल्यास नाविन्यपूर्ण, ‘आउट ऑफ द बॉक्स’ कल्पना विकसित करता येतात. मानवी मेंदूला सुचणाऱ्या अनेक कल्पना एआयला शक्य नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवावा. उद्याचे अभियंते हेच राष्ट्रनिर्माणाचे खरे शिल्पकार आहेत, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे संशोधन संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी केले.
रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) आणि आयईईई महाराष्ट्र सेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एशियन कॉन्फरन्स ऑन इनोव्हेशन इन इमर्जिंग टेक्नॉलॉजी (ASIAConf) २०२६’ या सहाव्या आशियाई परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ॲटलास स्किलटेक युनिव्हर्सिटी, मुंबईचे डॉ. शशिकांत पाटील, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. केतन कोटेचा, पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, उद्योजक जयश जगताप, आयईईई महाराष्ट्र सेक्शनचे व्हाइस चेअर डॉ. सौरभ सोनी, डॉ. प्रमोद बिडे, आयईईई इंडिया कौन्सिलचे व्हाइस चेअर डॉ. चाणक्य झा, परिषद समन्वयक डॉ. राहुल मापारी, पीसीसीओईआरच्या ई अँड टीसी विभागाचे प्रमुख डॉ. किरण नाप्ते, डॉ. विजयलक्ष्मी कुंभार आदी उपस्थित होते. यावेळी परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. पाटील म्हणाले, सध्या एआयचा वापर सुमारे पाच टक्के क्षेत्रात होत असून तब्बल ९५ टक्के क्षेत्रात त्याच्या वापराची मोठी संधी आहे. या तंत्रज्ञानाचा वापर योग्य दिशेने होणे आवश्यक आहे. केवळ ऊर्जा निर्माण करणे महत्त्वाचे नसून ती कोणत्या पद्धतीने निर्माण केली जाते, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. हवामानाचा अंदाज, शाश्वतता आणि पर्यावरणाशी संबंधित गणिते सोडविण्यासाठी एआयचा उपयोग होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु