
मुंबई, 04 सप्टेंबर (हिं.स.)। विशालचा 'हनुमान अंश' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामगिरी करत असून, जागतिक स्तरावर ७५ कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. 'आवारापन २' आणि 'बंटवारा' सारखे मोठे चित्रपट आल्यामुळे, या चित्रपटाच्या प्रयोगांची (स्क्रीनिंग्ज) संख्या २५० वरून थेट २५ वर आली. शिवाय, पीव्हीआर (PVR) आणि सिनेपोलिस (Cinepolis) सारख्या मोठ्या मल्टिप्लेक्स साखळ्यांनी सुरुवातीला या चित्रपटाला पुरेशी स्क्रीन्स देण्याबाबत साशंकता दर्शवली होती. अशा कठीण परिस्थितीतही, हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरला.
चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशाल चतुर्वेदीने मुख्य अभिनेता शोभिनव सत्य आणि संगीतकार ऋषी पाठक यांच्यासोबत स्वतः पुढाकार घेतला. प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या त्रिकुटाने सुरत आणि अलीगडसारख्या शहरांना भेटी दिल्या. या प्रयत्नांचे फळ मिळाले; प्रेक्षकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपटगृहांमधील प्रयोगांची संख्या पुन्हा वाढवावी लागली. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कामगिरी आता निर्मात्यांसाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.
सुमारे २ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला 'हनुमान अंश' आता जागतिक स्तरावर प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर, विशालने हिंदी चित्रपटसृष्टीबद्दलची आपली नाराजीही व्यक्त केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात चित्रपटसृष्टीकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही, असे त्याने नमूद केले; मात्र टीमची मेहनत, प्रेक्षकांचे प्रेम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या चित्रपटाचे नशीब पालटले. आता जागतिक प्रदर्शनाद्वारे या चित्रपटाची कथा आणि प्रवास आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर