
पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
दुरुस्तीअभावी क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठवण करणाऱ्या जलसंधारण संरचनांची क्षमता आता पुन्हा पूर्ववत होणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ३५ गावांतील ३९ पाझर तलाव, बंधारे आणि अन्य जलसंधारण संरचनांच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या कामांमुळे सुमारे २.१९ दशलक्ष घनमीटर (०.०८ टीएमसी) पाणीसाठवण क्षमता पुनर्संचयित होणार असून, ५४३.४२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. शिरूर, भोर, राजगड, बारामती, दौंड, पुरंदर आणि इंदापूर या सात तालुक्यांतील गावांमध्ये ही कामे केली जाणार आहेत.यामध्ये पाझर तलाव, साठवण बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, वळण बंधारे तसेच नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांचा समावेश आहे. पाझर तलावांचे सांडवे बांधणे तसेच तलावांचे मजबुतीकरणही केले जाणार आहे.दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या माध्यमातून उपलब्ध जलस्रोतांची साठवण क्षमता पूर्ववत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात अडवून ते जमिनीत मुरविण्याची क्षमता वाढण्याची अपेक्षा आहे. परिणामी भूजलपातळी सुधारण्यासह शेतीसाठी उपलब्ध पाण्याचा लाभ वाढण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु