
पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.) कोथरूड येथील कर्वे पुतळा आणि वारजे येथील आंबेडकर चौक येथे मेट्रो मार्गिकेसह उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपुलांसाठी सुमारे ४०४ कोटी रुपयांचा प्राथमिक खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा आराखडा महामेट्रोकडून तयार करण्यात आला असून, मेट्रो व्हायाडक्टच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.एसएनडीटी महाविद्यालय ते माणिकबाग या मेट्रो मार्गिकेला मंजुरी मिळाली आहे. या मार्गावर कोथरूड आणि वारजे येथे दोन ठिकाणी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन पुणे महापालिका आणि महामेट्रोच्या माध्यमातून करण्यात आले आहे.महामेट्रोने तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यानुसार, दोन्ही दुमजली उड्डाणपुलांसह मेट्रोच्या व्हायाडक्टसाठी एकत्रितपणे सुमारे ४०४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावामुळे रस्ते वाहतूक आणि मेट्रो वाहतूक यांचे एकत्रित नियोजन करण्यात येणार आहे.प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावर २० मीटर रुंदीचा, दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन लेनचा रस्ता असणार आहे. तर त्याच्या वरील दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच मेट्रो मार्गिकेलाही स्वतंत्र जागा मिळणार आहे.दरम्यान, मेट्रो व्हायाडक्टच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. महापालिका आणि महामेट्रोच्या समन्वयातून दुमजली उड्डाणपुलांच्या कामाचे नियोजन पुढे नेण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु