
पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील सूक्ष्म व लघू उद्योग घटकांना राज्य शासनाच्या वतीने जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी पात्र उद्योजकांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी केले आहे.
जिल्हा पुरस्कारामध्ये प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास १५ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास १० हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी उद्योग घटकाची उद्यम नोंदणी १ जानेवारी २०२३ पूर्वीची असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उद्योग घटक मागील दोन वर्षांपासून सलग उत्पादन प्रक्रियेत कार्यरत असावा. संबंधित सूक्ष्म किंवा लघू उद्योग कोणत्याही संस्था अथवा बँकेचा थकबाकीदार नसणे आवश्यक आहे.
शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार पात्र सूक्ष्म व लघू उद्योगांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र उद्योजकांनी विहित नमुन्यातील अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सादर करावेत, असे जिल्हा उद्योग केंद्राने कळविले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे-५ येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. अर्ज व पुरस्कारासंदर्भातील अधिक माहितीसाठी उप आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, पुणे येथे किंवा ०२०-२५५३७९६६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु