
पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) ३० ऑगस्ट २०२४ रोजी ध्वनीप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी पुणे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ज्येष्ठ ऑडिओलॉजिस्ट डॉ. कल्याणी मांडके, विवेक वेलणकर आणि निसर्गसेवक संस्थेच्या वतीने पोलिसांना यासंदर्भात पत्र देण्यात आले आहे.डॉ. मांडके यांनी ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर एनजीटीच्या पश्चिम विभागीय खंडपीठात अर्ज दाखल केला होता. नवीन कायदा करण्याऐवजी अस्तित्वात असलेल्या ध्वनीप्रदूषण नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हा या अर्जामागील मुख्य उद्देश होता. या अर्जावर सुनावणी करताना एनजीटीने २०२४ मधील पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी ध्वनीप्रदूषण नियंत्रणासंदर्भात नऊ महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते.एनजीटीच्या आदेशानुसार, गणपती मंडपाजवळील ध्वनीची पातळी तत्काळ मोजून ती नागरिकांना स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख चौकांमध्येही ध्वनीची पातळी मोजण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.परिसराच्या स्वरूपानुसार स्पीकरची संख्या आणि ध्वनीची मर्यादा निश्चित करण्याची सूचनाही आदेशात करण्यात आली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास साऊंड सिस्टीम जप्त करण्याबरोबरच संबंधित दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश एनजीटीने दिले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. त्यामुळे एनजीटीच्या निर्देशांनुसार आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु