
पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.) -
प्रभाग क्रमांक ३९ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज परिसरात पुणे महापालिकेतर्फे तब्बल ६२ कोटी रुपये खर्च करून चार एकर जागेवर अद्ययावत ‘मॉडेल स्कूल’ उभारण्यात येणार आहे. मात्र, ही शाळा सुरू झाल्यानंतर आवश्यक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कशा पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.प्रभाग क्रमांक ३९ क मधील सर्वे क्रमांक ६६०, सुखसागर नगर भागातील राजीव गांधी नगर परिसरात शाळेसाठी आरक्षित असलेली चार एकर जागा सध्या मोकळी आहे. या परिसरातील नागरिक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या ठिकाणी ई-लर्निंग शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.महापालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात या प्रकल्पासाठी केवळ ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ६२ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त आर्थिक दायित्व स्वीकारावे लागणार आहे.यासाठी प्रशासनातर्फे प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर मांडण्यात येणार असून, या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता प्रकल्पाच्या उर्वरित निधीची तरतूद करण्याबरोबरच प्रस्तावित शाळेसाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन कसे केले जाणार, याकडेही लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु