
पुणे, 04 सप्टेंबर, (हिं.स.)।महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने ८९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला, तरी या महत्त्वाकांक्षी योजनेसमोर आता जागेचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पाणी साठवणुकीच्या टाक्या उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या ३७ जागांसाठी महापालिकेने जमीनमालकांकडून प्रस्ताव मागविले होते. मात्र, महिनाभरात केवळ चार जागांसाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.जागा उपलब्ध होत नसल्याने महापालिका प्रशासनाची अडचण वाढली आहे. त्यामुळे आता संबंधित भागातील विद्यमान व माजी लोकप्रतिनिधी तसेच स्थानिक नेत्यांची मदत घेऊन आवश्यक जमीन उपलब्ध करून घेण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.या योजनेत नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, नऱ्हे, सणसनगर, खडकवासला, धायरी, जांभुळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडी यांसह ३२ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये विविध ठिकाणी एकूण ३७ पाण्याच्या टाक्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र, या गावांचा विकास आराखडा (डीपी) अद्याप अंतिम झालेला नसल्याने सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक असलेल्या जागांचे आरक्षण निश्चित झालेले नाही. परिणामी, पाण्याच्या टाक्यांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेला सध्या खासगी जमीनमालकांवर अवलंबून राहावे लागत आहे.डीपी मंजूर होण्यास आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीपीच्या मंजुरीपर्यंत पाणीपुरवठा योजनेचे काम थांबविणे शक्य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यासाठी खासगी जागा उपलब्ध करून घेण्याबरोबरच स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु