
पुणे, 04 सप्टेंबर (हिं.स.)। विशेष गरजा असलेल्या बालकांना सुरक्षित, प्रेमळ आणि आधार देणारे कुटुंब मिळावे, तसेच त्यांच्या पुनर्वसनाला चालना मिळावी यासाठी दत्तक प्रक्रियेत प्रादेशिक पातळीवरील सहकार्य आणि समन्वय अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्य दत्तक संसाधन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भावना सक्सेना यांनी केले.
भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग आणि राज्य दत्तक संसाधन संस्था (SARA), महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) यांची पश्चिम विभागीय सल्लागार कार्यशाळा पुण्यात झाली. दत्तक प्रक्रिया, बाल पुनर्वसन आणि कुटुंबाधारित संगोपनाबाबत अनुभवांची देवाणघेवाण व विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास सक्सेना यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेला राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवाडे, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त वर्षा लड्डा, उपायुक्त वर्षा पवार यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात, गोवा तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव या पश्चिम विभागातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ७४ हून अधिक जिल्ह्यांमधील सुमारे १५० संबंधित घटकांनी कार्यशाळेत सहभाग घेतला.
विशेष गरजा असलेल्या बालकांच्या दत्तक प्रक्रियेला व्यापक स्वरूप देण्यासाठी सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्न आवश्यक असल्याचे सक्सेना यांनी सांगितले. २०२५-२६ मध्ये विशेष गरजा असलेल्या ३९४ बालकांना दत्तक देण्यात आले असून, २०२४-२५ मध्ये ही संख्या ३१३ होती. यापूर्वी आयोजित प्रादेशिक कार्यशाळांमुळे दत्तक प्रक्रियेत २५ टक्के वाढ नोंदविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
आयुक्त वर्षा लड्डा म्हणाल्या, दत्तक प्रक्रियेत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. अनाथ बालकांना हक्काचे घर मिळवून देणे हा शासनाचा उद्देश आहे. नात्यातील दत्तक प्रक्रियेतही आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे. दत्तक प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी कार्यशाळेतून प्राप्त सूचनांचा विचार करून आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल.
कार्यशाळेतून प्राप्त होणाऱ्या शिफारशी भविष्यातील हस्तक्षेप, कुटुंबाधारित संगोपनाचा विस्तार आणि विविध संबंधित यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरतील, असेही लड्डा यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु