
मुंबई, 04 सप्टेंबर, (हिं.स.)। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक गुरु असतो, जो केवळ शिकवत नाही तर नकळत आपल्याला घडवतही असतो. 'सन मराठी'वरील 'सौभाग्यवती वृंदा मोहन' मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता संग्राम समेळने वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी कलाक्षेत्रात पाऊल ठेवले. लहान वयापासून अभिनय करताना त्याला आयुष्यात भेटलेल्या अनेक व्यक्तींकडून काही ना काही शिकायला मिळालं. याच गुरुंची आठवण सांगत शिक्षक दिनानिमित्त संग्रामने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देताना संग्राम म्हणाला, “अभिनयाचं बाळकडू मला आई-बाबांकडूनच मिळालं, त्यामुळे कलाक्षेत्रातील माझे पहिले गुरु तेच आहेत. लहानपणापासून अभ्यास सांभाळत मी अभिनय केला आहे. जसजसा मोठा होत गेलो, तसतसं बाबांनी या क्षेत्रात कसं टिकून राहायचं आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरं कसं जायचं हे शिकवलं. आईकडून प्रेम करायला आणि माणसं जपायला शिकलो, तर बाबांकडून लढण्याची जिद्द मिळाली. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते. सेटवरील स्पॉटबॉयपासून ते आपल्या सहकलाकारांपर्यंत, प्रत्येकाकडून काहीतरी शिकता येतं. शरीरात कितीही थकवा असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवून काम करणं मी त्यांच्याकडून शिकलो. माझ्या बायकोने मला संयम ठेवायला आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्यायला शिकवलं.”
कलाक्षेत्रात संग्रामला आईसारखी माया देणारी व्यक्ती म्हणजे अभिनेत्री हर्षदा खानविलकर. 'मुलगी पसंत आहे' या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं असून त्यांचं नातं त्याही आधीपासूनच जिव्हाळ्याचं आहे. तिच्याबद्दल बोलताना संग्राम म्हणाला की, “हर्षदा ताई तिच्या सगळ्या लेकरांवर खूप प्रेम करते. तिच्या बद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर, आपण एखाद्याला सहज म्हणतो की घरी पोहोचल्यानंतर फोन कर, पण आपण स्वतः कधी कधी ते विसरतो. मात्र हर्षदा ताई स्वतः फोन करून ‘पोहोचलास का?’ हे आवर्जून विचारते. अगदी नाईट शूट असेल आणि ती माझ्यासोबत नसेल, तरी पहाटे चार साडेचार वाजता फोन करून माझी चौकशी करते. तिच्याकडून प्रत्येक व्यक्तीवर भरभरून प्रेम करायला शिकलो. कुणीतरी आपल्यावर प्रेम करतं यापेक्षा आपण कुणावर प्रेम करतो आणि त्यातून आपल्याला समाधान मिळतं, ही गोष्ट मी तिच्याकडून शिकलो. शिक्षक दिनानिमित्त तिच्यासोबत वेळ घालवायची संधी मिळाली, तर तिला परदेशात फिरायला घेऊन जाणं मला नक्कीच आवडेल.”
सध्या 'सौभाग्यवती वृंदा मोहन' या मालिकेत रंजक वळण आलं आहे. वृंदा मोहनच्या शोधात असून तिचा हा शोध तिला कुठे घेऊन जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अभिमन्यूच मोहन आहे का, हा प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत आहे. वृंदा मोहन आपल्या शोधात यशस्वी होणार का आणि या शोधातून कोणतं सत्य समोर येणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. ही मालिका दररोज रात्री ९:४५ वाजता सन मराठी वाहिनीवर प्रसारित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर