सोलापुरातील ई-बस सेवेला ‘चार्जर’चा अडथळा; २० बस डेपोत दाखल
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या २० नवीन ई-बसची प्रवासी सेवा सुरू होण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गुरुवारी सर्व २० बसचे आरटीओ पासिंग पूर्ण झाले असले, तरी
E bus


सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात दाखल झालेल्या २० नवीन ई-बसची प्रवासी सेवा सुरू होण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. गुरुवारी सर्व २० बसचे आरटीओ पासिंग पूर्ण झाले असले, तरी बससाठी आवश्यक चार्जर अद्याप दाखल झालेले नसल्याने पुढील तांत्रिक प्रक्रिया रखडली आहे.

महापालिकेच्या परिवहन उपक्रमासाठी दाखल झालेल्या या पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज ई-बस सेवेमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वीच्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहेत.

बुधवार पेठ येथील महापालिकेच्या डेपोत कंपनीकडून चार्जर दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, हरियाणावरून येणारे चार्जर अद्याप सोलापुरात दाखल झालेले नाहीत. त्याचबरोबर थर्ड पार्टी अहवालाची प्रक्रियाही पूर्ण होणे आवश्यक आहे.

चार्जिंग यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतरच या बस नियमितपणे मार्गावर धावू शकणार आहेत. चार्जिंगसाठी आवश्यक वीज जोडणीसंदर्भात महावितरणकडे महापालिकेला सुमारे दोन कोटी रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागणार होती. ही रक्कम महापालिकेने भरली आहे. त्यामुळे आता चार्जर दाखल होणे आणि उर्वरित तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बुधवार पेठ परिसरात महापालिकेच्या मालकीच्या जागेवर बस डेपो उभारण्यात आला आहे. मात्र, हा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने ई-बसच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

डेपोत ई-बस लावू नयेत, अशा मुद्द्यावरून काही अतिक्रमणधारकांकडून महापालिका प्रशासनाशी हुज्जत घातल्याच्या घटना घडल्याची माहिती आहे. त्यामुळे नवीन बस दाखल झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनाला अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande