सोलापूर - महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईचा दुसऱ्याच दिवशी फज्जा?
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.) शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, कारवाई झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण उभे राहत असल्याने महापालिकेच्या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नच
smc


सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)

शहरातील अतिक्रमणांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. मात्र, कारवाई झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण उभे राहत असल्याने महापालिकेच्या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेकायदेशीरपणे चारचाकी वाहने उभी करणे, खोके आणि चहाच्या टपऱ्या उभारल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील काही जागांवर अतिक्रमण करून त्या व्यावसायिक वापरासाठी बळकावल्याचे चित्र दिसून येते.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्त आणि जेसीबीच्या मदतीने कारवाई केली. दक्षिण तहसील कार्यालयासमोरील चहाच्या टपऱ्या व खोके हटविण्यात आले. काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून खोके व चारचाकी वाहने हटविल्याने परिसर काही काळ मोकळा झाला. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागतही करण्यात आले.

मात्र, बुधवारी याच परिसरात पुन्हा चारचाकी वाहने, खोके आणि चहाच्या टपऱ्या पूर्वीच्याच ठिकाणी दिसून आल्या. त्यामुळे महापालिकेने केलेली कारवाई कितपत प्रभावी ठरली, असा सवाल उपस्थित होत आहे.

अतिक्रमण हटविल्यानंतर ते पुन्हा उभे राहत असेल, तर महापालिकेच्या कारवाईचा नेमका परिणाम काय? अतिक्रमणधारकांवर सातत्याने कारवाई का होत नाही? कारवाईनंतर जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिका कोणती उपाययोजना करणार, असे प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

मंगळवारी हटवलेले अतिक्रमण पुन्हा उभे राहिल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवरही चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि पुन्हा कारवाई केली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande