
सोलापूर, 04 सप्टेंबर, (हिं.स.)।
जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यंदा आतापर्यंत केवळ १०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शेतीसाठी पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांना चांगलेच धारेवर धरले.
अध्यक्ष वैद्य यांनी काटकर यांच्याकडून जिल्ह्यातील सद्यस्थितीतील पाणीटंचाईचा आढावा घेतला. यावेळी पाणीटंचाईबाबत अपेक्षित माहिती आणि स्पष्ट उत्तरे मिळत नसल्याने अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली.
सध्या सोलापूर जिल्ह्यात ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आणखी किती गावांनी टँकरसाठी मागणी केली आहे, याची माहिती अध्यक्ष वैद्य यांनी घेतली. तसेच जिल्ह्यातील पाणीपातळीचा सर्वंकष सर्वेक्षण करण्यात आला आहे का, याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली.
पाणीपातळीचा सर्वेक्षण झाले नसेल तर तातडीने संपूर्ण जिल्ह्याचा सर्वेक्षण करून त्याचा अहवाल सादर करा, अशा स्पष्ट सूचना अध्यक्ष दीपक वैद्य यांनी कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांना दिल्या.
सप्टेंबर महिना सुरू झाला असला तरी जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सोलापूरकरांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत. परतीच्या पावसानेही दडी मारल्यास जिल्ह्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता अध्यक्ष वैद्य यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड