
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर कठोर निकष व अटी न लावता सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.
यासंदर्भात देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक भागांत पिकांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पिकांची उगवणही झालेली नाही. पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र त्यातूनही अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीसाठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतीबरोबरच पशुधनासाठी पाणी व चाऱ्याची उपलब्धता हा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाने दुष्काळ जाहीर करण्यासाठी कठोर निकषांचा आग्रह न धरता जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे. तसेच शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड