मोहिते-पाटील पिता-पुत्रांची बबनदादा शिंदेंना सदिच्छा भेट; जुन्या स्नेहबंधांना उजाळा
सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। राजकारणात मतभेद असले तरी व्यक्तिगत नात्यांमध्ये जपलेला जिव्हाळा अनेकदा अधोरेखित होत असतो. याचा प्रत्यय माढा तालुक्यात नुकताच आला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी म
मोहिते-पाटील पिता-पुत्रांची बबनदादा शिंदेंना सदिच्छा भेट; जुन्या स्नेहबंधांना उजाळा


सोलापूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।

राजकारणात मतभेद असले तरी व्यक्तिगत नात्यांमध्ये जपलेला जिव्हाळा अनेकदा अधोरेखित होत असतो. याचा प्रत्यय माढा तालुक्यात नुकताच आला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांची निमगाव येथे भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. राजकीय विरोधाच्या पलीकडे जाऊन झालेल्या या अनपेक्षित भेटीची सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

बबनदादा शिंदे यांच्यावर अमेरिकेत यशस्वी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. उपचारानंतर ते नुकतेच माढा तालुक्यातील निमगाव येथे परतले आहेत. त्यांच्या आगमनानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी निमगाव येथे जाऊन बबनदादांची सदिच्छा भेट घेतली.

शिंदे आणि मोहिते-पाटील गटांमध्ये गेल्या काही वर्षांत माढा आणि सोलापूरच्या राजकारणात तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. मात्र, या राजकीय मतभेदांना बाजूला ठेवत मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी बबनदादांची घेतलेली भेट विशेष ठरली आहे.

भेटीचा मुख्य उद्देश बबनदादांच्या प्रकृतीची विचारपूस करणे हाच असला, तरी दोन प्रभावी आणि परस्परविरोधी राजकीय गटांमधील प्रमुख नेत्यांची ही भेट असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यात पूर्वीपासूनच जिव्हाळ्याचे आणि सहकार्याचे संबंध राहिले आहेत. याच जुन्या स्नेहबंधातून ही भेट झाल्याचे मोहिते-पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. भेटीदरम्यान मोहिते-पाटील पिता-पुत्रांनी बबनदादांच्या प्रकृतीची आपुलकीने विचारपूस करत त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande