
पुणे, 04 सप्टेंबर, (हिं.स.)।
‘घराघरातील तिसरी संतती अर्जुन घडविण्यासाठी’ किंवा ‘घराघरातील एक संतती अर्जुन घडविण्यासाठी’ या विषयावर राष्ट्रीय युवाप्रज्ञाशोध निबंध स्पर्धेचे आयोजन कौशलम् न्यासाच्या वतीने करण्यात आले आहे. संस्कृतसह सर्व भारतीय भाषांमध्ये ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेसाठी १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत निबंध सादर करता येणार आहेत.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (एमईएस), सुदर्शन टीव्ही, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि नागरी लिपी परिषदेच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची माहिती मुख्य संयोजिका तथा माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे आणि एमईएसच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील यांनी दिली. गेल्या वर्षी ‘आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?’ या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
स्पर्धेत बारावीपर्यंतचे शालेय विद्यार्थी, बारावीनंतरचे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्व नागरिक अशा तीन श्रेणी असतील. इच्छुकांनी www.kyps.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून १५ ऑक्टोबरपर्यंत निबंध अपलोड करायचे आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी सुमारे १,२०० शब्द, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २,००० शब्द, तर नागरिकांसाठी सुमारे २,५०० शब्दांची मर्यादा आहे. प्रत्येक श्रेणी व भाषेनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १० हजार, ७ हजार ५०० आणि ५ हजार रुपये अशी रोख पारितोषिके तसेच सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पारितोषिकांची संख्या वाढविण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.
स्पर्धेचा निकाल नोव्हेंबर २०२६ अखेर जाहीर करण्यात येणार असून डिसेंबर २०२६मध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे.
स्पर्धेची नियमावली, सविस्तर माहिती आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासाठी आयोजकांच्या यूट्यूब चॅनेल व फेसबुक पेजवर माहिती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी सुनिता फडके (८८८८२३४४४४), सचिन कानडे (८३०८८२००५१) किंवा पवन भराडिया (९३२२३१४६९२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु