अमरावतीत डेंग्यूसदृश्य तापाने १४ वर्षीय बालिकेचा मृत्यू; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कुटुंबीयांचा आरोप
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)। चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथे डेंग्यूसदृश्य तापाने १४ वर्षीय मिनाक्षी विलास मडावी हिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ सप्टेंबर रोजी घडली. उपचारादरम्यान तिची प्रकृती गंभीर होत गेल्याने अखेर पीडीएमसीमध
डेंग्यूसदृश्य तापाने १४ वर्षीय बालिकेचा मृत्यू; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कुटुंबीयांचा आरोप


अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथे डेंग्यूसदृश्य तापाने १४ वर्षीय मिनाक्षी विलास मडावी हिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २ सप्टेंबर रोजी घडली. उपचारादरम्यान तिची प्रकृती गंभीर होत गेल्याने अखेर पीडीएमसीमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर गावातील अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव आणि दूषित पाणीपुरवठ्यास प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप मिनाक्षीच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी केला आहे.मिनाक्षीला २३ ऑगस्ट रोजी ताप आला होता. चांदूर रेल्वे येथील एका खासगी दवाखान्यात तपासणी केल्यानंतर रक्त तपासणीत डेंग्यूचे निदान झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर २४ ऑगस्ट रोजी तिला अमरावती येथील इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले तसेच दोन युनिट रक्त देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने २८ ऑगस्ट रोजी तिला पीडीएमसीमध्ये रेफर करण्यात आले.आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने कुटुंबीयांनी मिनाक्षीला अमरावतीतील राजेंद्र गोडे रुग्णालयात दाखल केले. तेथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला पुन्हा पीडीएमसीमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र आर्थिक अडचणींमुळे कुटुंबीय तिला ३० ऑगस्ट रोजी पुन्हा शिरजगाव कोरडे येथे घेऊन आले.याबाबत माहिती मिळताच आरोग्य विभागाने पुढाकार घेतल्याचा दावा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियंका निकोसे यांनी केला आहे. आरोग्य विभागाने स्वतः रुग्णवाहिका आणि सीएचओ पाठवून कुटुंबीयांचे समुपदेशन केले व मिनाक्षीला पुन्हा अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.दरम्यान, डॉक्टरांनी मिनाक्षीला डेंग्यूसह कावीळ व इतर संसर्ग झाल्याचे निदान केल्याची माहिती तिची आत्या ललिता सोळंकी यांनी दिली. कावीळचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्याने मेंदूज्वरासह अन्य गुंतागुंत निर्माण झाल्याचा दावा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

मिनाक्षीच्या जन्मानंतर आईचे निधन झाले होते, तर वडील कुटुंबापासून दूर गेले. त्यामुळे आजी-आजोबा आणि दोन आत्यांनी तिचा सांभाळ केला. शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.गावात अनेक ठिकाणी सांडपाणी साचलेले असून नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाकीची कित्येक वर्षांपासून स्वच्छता करण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दूषित पाणीपुरवठा, अस्वच्छता आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव याबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याने संबंधित प्रशासन व आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.--------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande