
बीड, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
पेठ बीड पोलिसांनी शुक्रवारी रात्री बिलाल नगर परिसरातील एका घरावर छापा टाकत तब्बल दोन लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. या कारवाईत एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार्शी नाका, इमामपूर रोडवरील बिलाल नगर परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक निलेश केळे यांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केळे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत घरावर छापा टाकला. यावेळी घरातून जवळपास दोन लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून,गुन्हा दाखल करण्याची पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis