
कंत्राट मिळूनही कामाला सुरुवात नाही
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)
गणेशोत्सवास उणेपुरे दहा दिवस शिल्लक असताना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका यंत्रणेला अद्यापही जाग आलेली नाही. लोकप्रतिनिधींनी तासल्यानंतर खड्डे बुजवण्यास प्रारंभ करण्याचे शहाणपण प्रशासनाला सुचले आहे. शहरातील रस्त्यांवर एकूण दीड हजार खड्डे असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली असून ते बुजवण्यासाठी १ कोटी ९५ लाख रूपयांचे कंत्राट देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. आनंदाला उधाण आणणाऱ्या गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ठिकठिकाणी गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना केली जाते. त्यासाठी आगमन व विसर्जनाची मोठी वाजतगाजत मिरवणुकाही काढण्यात येतात. गणेशमुर्तीचे आगमन ट्रक, ट्रक्टर किंवा छोट्या चाकचाकी वाहनासह लोटगांड्यांवरूनही होते. ऐपतीप्रमाणे गणेश मंडळ आगमन व विसर्जनाची मिरवणुका काढतात. मिरवणुकीसाठी रस्ते चांगले व खड्डेविरहीत असण्याची माफक अपेक्षा राहते. महापालिकेस मात्र त्यांच्या अखत्यारीतील रस्ते चकाचक व सुस्थितीत ठेवण्याचे भान कान टोचल्याशिवाय येत नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. नेहरू मैदानातून बहूतांश आगमन मिरवणुकांना प्रारंभ होतो. शहारातील विविध भागांमध्ये या मिरवणुका जातात. याच मार्गांवर मोठे खड्डे पडले आहेत. यंदा पावसाळा अपेक्षीत पर्जन्यमानापेक्षा कमी झाला असल्याने या खड्डयांची तीव्रता अधिक जाणवली नसली तरी त्यामुळे वाहनचालकांचे अपघात मात्र होऊ लागले आहेत. गोपाल नगर ते मायानगर मार्गावरील रस्त्यावरील खड्यात पडल्याने एका युवतीला डोक्यास गंभीर दुखापत झाली असून सतरा टाके पडल्याची घटना ताजीच आहे. अशाच अनेक घटना दैनंदिन झाल्या असतानाही महापालिकेस मात्र कंत्राटदाराकडून काम करून घेण्याची सुबुद्धी सुचलेली नाही. लोकप्रतिनिधींनी कान टोचल्यानंतर आता बांधकाम विभागाकडून गणेशोत्सावपुर्वी खड्डे बुजवून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन कोटीचा कंत्राट, मात्र काम शून्य
महापालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या मॅपींगनुसार शहरातील विविध रस्त्यांवर एकूण १५०० मोठे खड्डे पडले आहेत. ते बुजवण्यासाठी महिनाभरापुर्वी १ कोटी ९५ लाख रूपयांचे कंत्राट जुझर सैफी या कंत्राटदारास देण्यात आले आहे. कंत्राट पारित झाल्यापासून आजतागायत या कंत्राटदाराने कामास प्रारंभ केलेला नाही. गणेशोत्सवास उणेपुरे दहा दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमिवर घिसाडघाईने काम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तातडीने कामास सुरूवात करण्याच्या सूचना कंत्राटदारास देण्यात येणार असल्याचे शहर अभियंता कांबळे यांनी सांगितले.
मुख्य मार्गावर ९३ खड्डे
राजापेठ ते छत्रीतलाव या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर राजापेठ ते दस्तूर नगर या दरम्यान एकूण ९३ मोठे खड्डे असल्याची माहिती बांधकाम विभागाची आहे. याशिवाय राजापेठ ते गोरक्षण, गोपाल नगर, मायानगर, शंकर नगर, शेगाव रहाटगाव, साईनगर, अंबागेट, महादेव खोरी, बेनोडा, काँग्रेस नगर, वडाळी, आशियाना क्लब या मार्गांवरही मोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे राजापेठ ते छत्रीतलाव व काँग्रेस नगर ते आशियाना क्लब हा विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग आहे. येथे विसर्जनासाठी कुत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी