अमरावती - तळेगाव ठाकूर येथे दहीहंडी उत्सव उत्साहात, मुस्लिम विद्यार्थीनींचाही सहभाग
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी सर्वधर्म समभावाचा सुंदर संदेश.. तळेगाव ठाकूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेत गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
तळेगाव ठाकूर येथे दहीहंडी उत्सव उत्साहात..मुस्लिम विद्यार्थीनीचा ही सहभाग


अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)।

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी सर्वधर्म समभावाचा सुंदर संदेश..

तळेगाव ठाकूर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेत गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षणमहर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भगवान श्रीकृष्णाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या शाळेत काही मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनी आहेत त्यांनी सुद्धा आज झालेल्या शाळेच्या दहीहंडी कार्यक्रमात सहभाग घेतला.

बालकृष्णाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी पारंपरिक पद्धतीने सजून-धजून या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमातून शाळेतील विद्यार्थिनींनी सर्वधर्म समभावाचा सुंदर संदेश दिला. मुस्लिम समाजातील विद्यार्थिनींनी राधा व श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले.राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थिनींनी सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनींनी साकारलेले गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले. पारंपरिक घोषणाबाजी आणि आनंदाच्या जल्लोषात दहीहंडी फोडण्यात आली. यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या प्रांगणात साकारलेली आकर्षक रांगोळी, सजविलेली दहीहंडी आणि राधा-कृष्णाची वेशभूषा यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये सांस्कृतिक जाणीव, एकोपा आणि सर्वधर्म समभावाची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande