मागणी असुनही फुलांचे भाव स्थिर, विक्रेते, उत्पादकांमध्ये पसरली चिंता
अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.) जन्माष्टमीला झेंडूच्या दरात ६० टक्के घट जन्माष्टमी, श्रावणातील सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या ठोक बाजारात खरेदीसाठी फुले, हार विक्रेत्यांसह सर्वसामान्यांचीही गर्दी वाढत आहे. मंदिरांमधील सजावट, पूजाविधी, घरगुत
मागणी असुनही फुलांचे भाव स्थिर, फुलविक्रेते, फुलउत्पादकांमध्ये पसरली चिंता


अमरावती, 05 सप्टेंबर (हिं.स.)

जन्माष्टमीला झेंडूच्या दरात ६० टक्के घट

जन्माष्टमी, श्रावणातील सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या ठोक बाजारात खरेदीसाठी फुले, हार विक्रेत्यांसह सर्वसामान्यांचीही गर्दी वाढत आहे. मंदिरांमधील सजावट, पूजाविधी, घरगुती कार्यक्रमांसाठी फुलांना मागणी असली तरी यंदा विविध प्रकारच्या फुलांचे दर अपेक्षितपणे वाढले नाहीत. सण, उत्सवाला झेंडूच्या फुलांना मागणी असते. परंतु, यंदा जन्माष्टमीच्या दिवशी झेंडूच्या फुलांच्या दरात ६० टक्क्यांनी घसरण झाली, त्याचे कारण म्हणजे मागणी वाढली असली तरी बाजारात आवकही चांगली आहे. आता

गणेशोत्सव, गौरींचे आगमन होणार आहे. तेव्हा तर फुलांचे भाव आकाशाला भिडतात. झेंडू, जरबेरा, अष्टर, शेवंती, गुलाबाच्या दरात वाढ दिसून येते. मात्र, यंदा बाजारात मागणी असतानाही दर स्थिर असल्याची माहिती फुलांच्या ठोक विक्रेत्यांनी दिली. सणासुदीत भाव वाढतात मात्र यावर्षी मागणी असूनही शेवंतीच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी घट झाली. गुलाब, लिली, निशिगंधाच्या दरात ५० टक्क्यांनी घसरण झाली असून, काही फुलांचे दर स्थिर आहेत. महिनाभरापूर्वी ६० रुपये किलोचा झेंडू २० रुपये किलोवर आला. यामुळे ग्राहकात आनंद असला, तरी फुलविक्रेते, शेतकरी चिंतेत आहेत.

पुरेशी मागणी असूनही फुलांचे दर नियंत्रणात

बाजारात फुलांचे भाव सण, उत्सव नसताना जसे स्थिर असतात तसेच आहेत. सण, उत्सवाच्या काळात फुलांचे दर वाढतात. मात्र यंदा दरांत वाढ झालेली नाही; उलट काही प्रमाणात भाव कमी झाले आहेत. गुलाब फुलांचे दर ठोक बाजारात श्रावण महिना, जन्माष्टमी, गणेशोत्सवात २०० ते ३०० रुपये किलो असतात. मागणी जास्त असली की कधी त्याहूनही अधिक दर वाढतात. परंतु, यावर्षी तसे झाले नाही. झेंडूच्या भावातही घट झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande