

नवी दिल्ली, 05 सप्टेंबर (हिं.स.)। स्मार्टफोन बाजारात पोको आणि इन्फिनिक्सने आपल्या नव्या मॉडेल्सची भर घातली आहे. पोकोने ‘पोको एक्स८ पॉवर’ आणि ‘पोको एक्स८’ हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत. पोको एक्स८ मालिकेतील हे चौथे आणि पाचवे मॉडेल असून, यापूर्वी पोको एक्स८ प्रो आणि पोको एक्स८ प्रो मॅक्स बाजारात दाखल झाले आहेत. पोको एक्स८ची सुरुवातीची किंमत २९,९९९ रुपये, तर पोको एक्स८ पॉवरची किंमत ३५,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीकडून कूपन आणि एक्सचेंज ऑफरद्वारे दोन्ही फोनवर सवलतही दिली जात आहे. हे स्मार्टफोन ११ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होतील.
पोको एक्स८ पॉवरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची तब्बल १०,००० एमएएच क्षमतेची बॅटरी. यात १०० वॅट जलद चार्जिंग आणि २७ वॅट रिव्हर्स चार्जिंगची सुविधा आहे. पोको एक्स८मध्ये ९,००० एमएएच बॅटरी असून ६७ वॅट जलद चार्जिंग देण्यात आले आहे. दोन्ही फोनमध्ये ६.८३ इंचाचा १.५के एमोलेड डिस्प्ले, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन आणि गोरिला ग्लास व्हिक्टस २ संरक्षण मिळते. पोको एक्स८ पॉवरमध्ये स्नॅपड्रॅगन ६ जनरेशन ५, तर पोको एक्स८मध्ये स्नॅपड्रॅगन ६एस जनरेशन ४ प्रोसेसर आहे. दोन्ही फोन अँड्रॉइड १६ आधारित हायपरओएस ३वर चालतात.
दरम्यान, इन्फिनिक्सनेही ‘हॉट ७० प्रो ५जी’ भारतात सादर केला आहे. या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची सुरुवातीची किंमत २2,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.७६ इंचाचा फुल एचडी प्लस पंच-होल डिस्प्ले असून १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. मीडियाटेक डायमेन्सिटी ७१०० ५जी प्रोसेसरसह माली-जी५७ जीपीयू देण्यात आला आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत हॉट ७० प्रो ५जीमध्ये ५० मेगापिक्सेलचा सोनी आयएमएक्स८८२ मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ६,००० एमएएच बॅटरी असून ४५ वॅट जलद चार्जिंग आणि १० वॅट रिव्हर्स चार्जिंगची सुविधा आहे. या फोनचे खास आकर्षण म्हणजे मागील बाजूस दिलेले ‘ॲक्टिव्ह मॅट्रिक्स क्यूब’, जे कॉल, संदेश, चार्जिंग, हवामान आणि गेमिंगदरम्यान विविध प्रकाशमान सूचना दाखवते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule