
कोल्हापूर, 05 सप्टेंबर (हिं.स.)।
“उद्योजकतेमध्ये ‘टाईम टू मार्केट’ला अत्यंत महत्त्व आहे. जो उद्योजक इतरांपेक्षा आधी बाजारपेठेत पोहोचतो, त्याला गुंतवणुकीवरील परतावा मिळविण्याची संधी अधिक असते. योग्य वेळी तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि गुंतवणुकीचे सिंक्रोनायझेशन साधणारा उद्योजकच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो,” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी केले.
ग्नॅट फाउंड्री, शिरोली एमआयडीसी येथे ‘ॲव्हलॉन पॉवर’च्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या १०० किलोवॅट क्षमतेच्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाच्या चाचणीचा शुभारंभ डॉ. कामत यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, “कुलगुरू म्हणून अनेक उद्घाटनांना उपस्थित राहण्याची संधी मिळते. मात्र या प्रकल्पाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने नव्हे, तर प्रत्यक्ष पंप सुरू करून झाले, ही अत्यंत अनोखी बाब आहे. या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात वरुण जैन यांचे काम महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि गुंतवणुकीचे योग्य सिंक्रोनायझेशन साधणे हे उद्योजकाचे कौशल्य आहे आणि या बाबतीत वरुण जैन यांनी आघाडी घेतली आहे असे त्यांनी नमूद केले. शाश्वत विकास साधायचा असेल आणि निसर्गाला धक्का न लावता विकास करायचा असेल, तर त्यामध्ये हरित हायड्रोजनची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कोल्हापूरसारख्या औद्योगिक परिसराच्या विकासात विद्यापीठाचीही महत्त्वाची भूमिका आहे. जैन कुटुंबीयांनी या प्रकल्पात गुंतवणूक केली असून त्यामध्ये नवोपक्रम हा महत्त्वाचा घटक आहे. विद्यापीठाचे उद्योग-शैक्षणिक संस्थांमधील परस्परसंवादाचे काम या क्षेत्रात महत्त्वाचे ठरेल. अशा प्रकारच्या संशोधनाला शिवाजी विद्यापीठाकडून निश्चितच पाठबळ दिले जाईल असे डॉ. कामत यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी ॲव्हलॉन पॉवरच्या संचालिका आशा जैन, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, नवोपक्रम, इनोव्हेशन इंक्युबेशन व लिंकेजीज विभागाचे संचालक डॉ. सागर देळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच विद्यापीठातील संशोधक डॉ. ज्योतिप्रकाश यादव, डॉ. प्रमोद कोयाळे, डॉ. हेमराज यादव, प्रा. के. डी. सोनवणे व डॉ. आय. आर. उडचणा उपस्थित होते.
ॲव्हलॉन पॉवरचे संचालक वरुण जैन यांनी प्रास्ताविकात ग्रीन हायड्रोजन निर्मितीची प्रक्रिया, त्याचे विविध उपयोग आणि त्यासाठी आवश्यक कच्च्या मालाची माहिती दिली. ते म्हणाले, कोविड काळात ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली होती. त्यावेळी ॲव्हलॉन पॉवरने अवघ्या एका महिन्यात पीएसए ऑक्सिजन प्लांट तयार करून पाठविला. त्यानंतर देशभरात, पाकिस्तान सीमेपर्यंतही, २०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट पाठविण्यात आले. कोविडनंतर ऑक्सिजन प्लांटची मागणी कमी झाल्यानंतर आम्ही हरित हायड्रोजनच्या क्षेत्रात संशोधन सुरू केले. ग्रीन हायड्रोजनसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्याबरोबरच विविध संशोधकांसोबत तांत्रिक सहकार्य केले आहे. या तंत्रज्ञानाचे पेटंटही आमच्याकडे आहे. शिवाजी विद्यापीठासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. पाणी आणि वीज या नवीकरणीय स्रोतांच्या माध्यमातून हरित हायड्रोजन निर्मिती केली जाते. वाहन उद्योग, रासायनिक उद्योग तसेच खतनिर्मितीमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. सध्या १०० किलोवॅट क्षमतेच्या सूक्ष्म आकाराच्या प्रकल्पाचे परीक्षण पूर्ण झाले असून भविष्यात ५ किलोवॅटपासून १ मेगावॅटपर्यंत क्षमतेचे प्रकल्प विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे, असे जैन यांनी सांगितले.
डॉ. सागर देळेकर म्हणाले, विद्यापीठ आणि उद्योग एकत्र आले पाहिजेत. ॲव्हलॉन पॉवरसोबत संपर्क साधून या प्रकल्पाच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. आता या सहकार्याला आणखी पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. ग्रीन हायड्रोजन क्षेत्रातील संशोधनामध्ये शिवाजी विद्यापीठाचीही महत्त्वाची भूमिका राहील.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, कोल्हापूर ही सुधारकांची भूमी आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत वेगाने पावले उचलण्याची गरज असताना शिवाजी विद्यापीठ आणि उद्योजक यांच्या एकत्रित प्रयत्नातून पर्यावरणपूरक उद्योग उभा राहत आहे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पर्यावरणावरील मानवी हस्तक्षेपाची तीव्रता कमी करण्यासाठी अशा प्रकारचे अभिनव उपक्रम आणि उद्योग उभारणे ही काळाची गरज आहे. ग्रीन हायड्रोजन प्रकल्प म्हणजे पर्यावरणाला नवसंजीवनी देणारे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यावरणपूरक विचारांची आणि राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक परिवर्तनाच्या भूमीमध्ये असा प्रकल्प उभा राहत आहे, ही आनंदाची बाब आहे. उद्योगविश्व आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यातील सहकार्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे असे त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाची सुरुवात कोल्हापुरातून होत आहे आणि या प्रकल्पात शिवाजी विद्यापीठ महत्त्वाचा भागीदार आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कोविड काळातील परिस्थिती आपण अनुभवली आहे. कोल्हापूरमध्ये पाणी आणि सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपयोग करून ग्रीन हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प उभा राहत आहे, ही अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून कोल्हापूरचे नाव जागतिक स्तरावर झळकण्यास निश्चितच मदत होईल.
या कार्यक्रमाला कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकांत कुलकर्णी, सचिव नितीन वाडीकर, खजिनदार प्रसन्नकुमार तेरदाळकर, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, आयआयएफ कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सतीश कडूकर, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, खजिनदार बदाम पाटील, संचालक अतुल पाटील, निमंत्रित सदस्य एम. वाय. पाटील, भीमराव खाडे, प्रवीण पटेल, रामराजे बदले, कोल्हापूर फर्स्टचे सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव जयदीप पाटील, खजिनदार पद्मसिंह पाटील, विशेष निमंत्रित सदस्य नेमचंद संघवी, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, भरत ओसवाल, उद्योजक जितेंद्र राठोड, ॲव्हलॉन पॉवरचे अभियंता सुबोध पांगावकर आदी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन ॲव्हलॉन पॉवरचे विक्री व विपणन प्रमुख प्रवीणकुमार आंबेसकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar